गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाचे औचित्य साधून आ.च. विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवविद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व पाटी पूजनाने झाली. या वेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव व शेतीमित्र श्री. अशोकराव थोरात यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. तसेच, श्री. सदाशिव रामचंद्र पवार, सौ. मीना सदानंद कोळी, श्री. विकास शेवाळे उपस्थित होते. यावेळी श्री. गजानन जनार्दन शिर्के यांनी श्रीफळ वाढवून नवीन प्रवेशाचा श्रीगणेशा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री. अशोकराव थोरात यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याविषयी जागरूक व सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच, "जो जे वांछील तो ते लाहो" या सर्वधर्मसमभाव वृत्तीने ईश्वरचरणी प्रार्थना करत गुढीपाडवा व ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच, "कोळशाला हिरा बनवण्याचे कार्य आ.च. विद्यालय अविरत करत आहे," असे प्रतिपादन श्री. विकास शेवाळे यांनी केले.
नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वही, पेन व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. सचिव श्री. अशोकराव थोरात व शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले. या वेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. ए. बी. थोरात, पर्यवेक्षक श्री. बी. जी. बुरुंगले, आदर्श ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख सौ. शिला पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. कुंभार यांनी गुढीपाडव्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकत शिक्षण काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच, विविध शालेय उपक्रमांची माहिती देत पालकांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुरेखा खंडागळे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. ए. बी. थोरात यांनी मानले.