करपेवाडी : झाडांचे गाव, निसर्गसंवर्धनाचा नवा आदर्श!

सरपंच रमेश नावडकर यांच्या संकल्पनेतून हरित क्रांतीचा संकल्प



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड-ढेबेवाडी मार्गावर वांग खोऱ्यात वसलेले करपेवाडी गाव आता ‘झाडांचे गाव’ म्हणून ओळखले जात आहे. सरपंच रमेश नावडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या हरित मोहिमेमुळे गावाचे सौंदर्य वाढले असून, पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपणाची सुरुवात

सन २०२१ मध्ये मैत्री दिनाच्या निमित्ताने रमेश नावडकर यांनी गावातील मित्रमंडळींना एकत्र करत लोकसहभागातून ७० हजार रुपये जमा केले. या निधीतून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि मुख्य रस्त्यांवर सुमारे २०० झाडे लावण्यात आली. बहुतेक ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या उत्साहात केले जाते, मात्र त्यांचे संगोपन दुर्लक्षित राहते. मात्र, करपेवाडीने या संकल्पनेला वेगळे वळण दिले.

पाणी व्यवस्थापन व ठिबक सिंचनामुळे वृक्षसंवर्धन

झाडे टिकवण्यासाठी नावडकर यांनी विशेष प्रयत्न केले. आठवड्यातून दोन दिवस - बुधवार आणि शनिवार - झाडांना पाणी देण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली. झाडे मोठी झाल्यानंतर त्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. आज या प्रयत्नांचे फलित दिसत असून गाव हिरवेगार झाले आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी २ लाख रुपये खर्च झाले आहेत. गावात या झाडांवर पर्यावरण संदेश, पक्षी-प्राणी चित्रे आणि पारंपरिक वाद्यांच्या प्रतिमा रंगविण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे.



‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये करपेवाडीचा सहभाग

गावातील वृक्षसंवर्धन उपक्रमामुळे करपेवाडीने ‘माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धेत सहभाग घेतला आहे. रमेश नावडकर यांच्या नेतृत्वाखाली गावाने विकासाची नवी दालने उघडली आहेत. त्यांच्या कार्यकाळात सुमारे ३ ते ४ कोटींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये स्मशानभूमी, गणपती विसर्जन घाट अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

पर्यावरण संतुलनासाठी नवीन उपक्रम राबविण्याचा निर्धार : सरपंच रमेश नावडकर
गावासाठी काही तरी वेगळे करण्याची जिद्द मनात होती. फक्त झाडं लावून फोटो काढणं सोपं असतं, पण त्यांचं संगोपन करणं ही खरी जबाबदारी आहे! कुऱ्हाडबंदी किंवा वृक्षतोडीवर निर्बंध लावून काहीच साध्य होणार नाही, कारण आधुनिक साधनांनी ही तोड आजही सुरूच आहे.

जर खरंच पर्यावरण वाचवायचं असेल, तर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कटरला बंदी घालायलाच हवी. गाव आणि परिसरात आम्ही सातत्याने नवनवीन पर्यावरणपूरक उपक्रम राबवणार आहोत. मात्र, शासनाच्या नियमांइतकीच लोकांची जबाबदारीही महत्त्वाची आहे. झाडं लावणं ही जबाबदारी नव्हे, त्यांचं संगोपन करणं ही खरी समाजसेवा आहे! पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

करपेवाडी गावाच्या या प्रयत्नांनी संपूर्ण परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे करपेवाडी हे निसर्गसंवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरत आहे!