कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावाच्या हद्दीत शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. साताऱ्याकडे निघालेल्या कंटेनरचा टायर फुटल्याने तो उंब्रज पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. अपघाताचा जोर एवढा होता की कंटेनरचा पुढील भाग अक्षरशः चुराडा झाला. चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (MH 12 TV 9653) कराडहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. उंब्रज उड्डाण पुलावर येताच अचानक टायर फुटल्याने तो पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला (01 AA 2776) धडकला. धडक इतकी जोरदार होती की कंटेनर ट्रकच्या मध्यभागी घुसला आणि पूर्णपणे चक्काचूर झाला.
हा अपघात इतका भीषण होता की काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, प्रवासी अडकले आणि एकच गोंधळ उडाला. रात्रीच्या अंधारामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.
अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलीस आणि महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात हलवले आणि महामार्गावर अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या बचावकार्यात हायवे पेट्रोलिंग सी.आर.ओ. सुरज लोखंडे, ॲम्बुलन्स ड्रायव्हर ऋषी खालकर, विशाल ओवाळ तसेच हायवे पेट्रोलिंग टीममधील अनिल देसाई, ऋषी पवार आणि नवनाथ यादव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान, या अपघाताची अधिकृत नोंद रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. जखमी चालकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास उंब्रज पोलीस करत आहेत.