मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा: मळाई ग्रुपच्या वतीने भारतीय संविधानाच्या मराठीतील 500 रु. किमतीच्या 500 प्रती 500 व्यक्तींना मोफत दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम 14 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे घटना समितीतील सर्व सदस्यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. भारतीय संविधान हा कोणत्याही देशासाठी महत्त्वाचा दस्तऐवज असून, त्यामध्ये भारताच्या शासनाची ध्येयधोरणे, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकांचे अधिकार आणि कर्तव्ये स्पष्ट केले आहेत. संविधान वाचल्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची सखोल माहिती मिळते. लोकशाहीचे महत्त्व आणि देशाच्या इतिहासाची तसेच सांस्कृतिक महानतेची जाण होते. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करून त्याची समज विकसित करणे आवश्यक आहे.
मळाई ग्रुपच्या वतीने 500 रु. किमतीच्या 500 संविधान प्रती मोफत वितरित करण्यात येणार आहेत. इच्छुक व्यक्तींनी 12 एप्रिल 2025 पर्यंत समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर येथे प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे किंवा ईमेलद्वारे नोंदणी करावी. इच्छुक व्यक्तीची शैक्षणिक पात्रता किमान इ. 12 वी उत्तीर्ण असावी आणि संबंधित व्यक्ती सातारा जिल्ह्यातील रहिवासी असावी. संविधानाची प्रत संपूर्ण वाचावी आणि त्यानंतर स्वतःचा अभिप्राय लेखी स्वरूपात सादर करावा. संविधानाची प्रत संग्रहित ठेवण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीने घ्यावी.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांचे वैचारिक प्रबोधन करून संविधान वाचनाची सवय लावणे आणि लोकशाही मूल्ये समजावून देणे हा आहे. संविधान वाचनामुळे नागरिकांनी आपल्या हक्कांची व कर्तव्यांची जाण ठेवावी, अशी अपेक्षा या उपक्रमामागे आहे. अधिक माहितीसाठी समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय, मलकापूर येथे संपर्क साधावा.