पाटण मतदार संघातील विकासकामे २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : विशेष कार्यकारी अधिकारी सुनील गाडे


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार लोकनेते बाळासाहेब देसाई पंचायत समिती, पाटण येथे विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील गाडे यांनी सर्व खात्यांच्या प्रमुखांना २५ फेब्रुवारीच्या आत विकासकामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

यानंतर गाडे यांनी पाटण पंचायत समिती व शासकीय विश्रामगृह येथे थांबून तालुक्यातील नागरिक व पदाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामांसंबंधी अर्ज व निवेदने स्वीकारली . नागरिकांनी विविध समस्या मांडल्या असून, जवळपास १०० जणांनी आपल्या तक्रारी व मागण्यांचे निवेदने दिली. यावर तातडीने निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून कामे मार्गी लावण्यात आली.



विशेष कार्यकारी अधिकारी सुनील गाडे यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.