परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा: लाडकी बहीण, लाडका भाऊ पाठोपाठ आता ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना राज्य सरकारने खूश केले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार राज्यातील 65 वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना प्रत्येकी 10 हजार रुपये सन्मान निधी म्हणून देणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी केली. ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महामंडळाची पहिली बैठक पार पडली. त्यावेळी सरनाईक यांनी ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना प्रत्येकी 10 हजार रुपये सन्मान निधी म्हणून देण्याची घोषणा केली. महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री व आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील. मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहे. त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे. एखाद्या चालकाला दुखापत झाल्यास त्याला मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.