मान्याचीवाडी देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत...

ग्राम ऊर्जा स्वराजसह नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत पुरस्कार..अडीच कोटींच्या दोन पुरस्कारांची घोषणा; राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी दिल्ली येथे होणार गौरव.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा  पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. यासह ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्काराचीही मान्याचीवाडी मानकरी ठरली आहे. देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते दिल्ली येथे बुधवार दि. ११ रोजी या ग्रामपंचायतीला गौरविण्यात येणार आहे. तब्बल अडीच कोटी रकमेच्या देशपातळीवरील या डबल धमाक्यामुळे गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

   पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासामध्ये विविध उपक्रम राबवत दिशादर्शक काम केले आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्राम स्तरावरील विविध पुरस्कारांची घोषणा या विभागाच्या वतीने करण्यात आली.  यामध्ये शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर आधारित असलेल्या गरिबी मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक न्याय व सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव व महिला स्नेही गाव या बाबींवर विशेष काम करत शाश्वत विकासाची गावे निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीने  यशस्वी प्रयत्न केले. 

   भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवरील ग्रामपंचायतींची या पुरस्कारांसाठी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कारासाठी मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने या पुरस्कारांसाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या मुद्द्यांची खातरजमा करून मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला एक कोटी पन्नास लाखांच्या सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार घोषित करण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेल्या आणि अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे प्रभावी काम केल्याबद्दल एक कोटी रुपयांचा प्रथम क्रमांकाचा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे. एकाच वेळी देशपातळीवरील सर्वोत्तम दोन पुरस्कार गावाला मिळाल्याने ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. या पुरस्कारांसाठी यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे, गटविकास अधिकारी सविता पवार, अनिल वाघमारे,  राज्य समन्वयक अनिल बगाटे, श्रीधर कुलकर्णी, अमीर शेख, संतोष सकपाळ, बाळासाहेब बोराटे, जोती पाटील, मधुकर मोरे आदिंचे मार्गदर्शन लाभले. 

_______________________________________

गावकऱ्यांच्या कष्टाचे आणि एकीचे फळ...
चोवीस वर्षांपासून गावातील सर्वच घटकांनी गावांमध्ये लोकसहभागाची चळवळ उभी केली आहे. यामध्ये अनेक चढउतार पाहिले. कधी यश आले तर कधी अपयश आले मात्र कधीही खचून गेलो नाही. ग्रामविकासाची मशाल लोकांच्या सहकार्याने आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तेवत ठेवली. आज चारशे लोकसंख्येच्या छोट्याशा गावाने देशपातळीवरील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा बहुमान पटकावला हे सर्व श्रेय ग्रामस्थांच्या ऐक्याचे आहे.
~ रवींद्र माने: सरपंच मान्याचीवाडी

_______________________________________