महाराष्ट्र आता थांबणार नाही…, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुणी-कुणी घेतली शपथ? वाचा सविस्तर


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा 
महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ यावेळी घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा भव्य सोहळा आज पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असं लिहिण्यात आलं होतं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला समोर आला. या निकालाने एक्झिट पोलचे सगळे अंदाज फोल ठरवत नवा इतिहास रचला. महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळाला. महाराष्ट्रातील 288 पैकी 230 जागांवर महायुतीला यश आलं. पण इतकं यश मिळाल्यानंतरही महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेस प्रचंड विलंब झाला. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा रंगू लागली होती. महायुतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली होती.