सध्या मोबाईल वापरणारे व्हाटसअप वापरत नाही असे लोक अपवादात्मक आढळतील. या व्हाटसअप मधून अनेक चांगली कामे होत असतात. अशाच एका ग्रुपच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कुल कुठरे च्या 1989 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 35 वर्षानी एकत्र येवून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच केवळ एकत्र न येता शाळेला फुल ना फुलाची पाकळी म्हणून लॅपटाॅप देवून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.
बॅचचे माजी विद्यार्थी आणि सध्या ठाणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले विकास पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मोरे सर, ढेरे सर, देवकर सर, चव्हाण सर, बुधे सर, लोहार सर, दिक्षीत सर, शिंदे सर, भोई सर, भोई मॅडम, गुरव सर, पाटील मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमास राजाराम सागावकर, अरुण कदम, विलास पवार, महादेव पवार, आनंदा भिंगारदेवे, विजय नलवडे, आण्णा पाटील आणि सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान माजी विद्यार्थ्यांनीना सन्मानचिन्ह आणि साडी तर माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
तसेच या बॅच मधील जे विद्यार्थी मयत झाले होते त्यांच्या पत्नी यांना साडी देण्यात आल्या. यावेळी कुठरे पंचक्रोशीमधील एमपीएससी मध्ये निवड झालेल्या पीएसआय, महाराष्ट्र पोलीस, अभियंता पाटबंधारे विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आवश्यक असणारा लॅपटाॅप भेट दिला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव व 1989 च्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना दिनेश अरबुने यांनी केले.