उठावाच्या वेळी शंभुराज देसाई होते दोन पावलं पुढे... मुख्यमंत्र्यांनी सांगितला गुवाहाटीचा किस्सा


तांबवे|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यभरात एकच प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे येथे सभा घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी तांबवे येथे भर सभेत शंभुराज देसाई यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. 

इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी उठावावेळचा गुवाहाटीचा किस्साही सांगितला. "उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई दोन पाऊलं माझ्या पुढे होते. म्हणून मी त्यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री बनवले एक सातारा आणि दुसरा ठाणे जिल्हा…", असं मिश्किलपणे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्यावेळी आम्ही उठाव केला तेव्हा शंभुराज देसाई सर्वात पुढे होते माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यावेळेस त्यांनी कुठे चाललोय, काय करतोय, कशाला चाललोय, याबद्दल काहीही विचारले नाही. त्यांनी छातीचा कोट करून लढाई लढली आणि हेच पाटणचे पाणी मला दिसले. जो शब्द देतो, तो शब्द पाळणारा माणूस मला आवडतो. शंभुराज देसाईला घाबरायची गरज नाही कारण, त्याच्यामागे येडोबा आहे, नाईकबा आहे, भैरोबा आहे. ज्योतिबा आहे. सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामागे आहेत. म्हणून कोणी येऊ देत, पाटणचा गड शंभुराज देसाईच सर करणार”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभुराज देसाईंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.