लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ


दौलतनगर| कृष्णाकाठ वृत्तसेवा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ चा म्हणजेच ५१ वा गळीत हंगामाचा शुभारंभ आज दौलतनगर-मरळी येथे मा .ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी अनेक सभासद आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

मा.नां‌.शंभूराज देसाई यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, "लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा पाटणमधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे हित नेहमीच जोपासले आहे. चेअरमन यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने कारखान्याचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. भविष्यातही कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील," असे त्यांनी सांगितले.

त्यांनी सहकार क्षेत्रासाठी महायुती सरकारच्या कटिबद्धतेवर भर दिला. "महायुती सरकारने सहकार क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन मी येथे करत आहे," असे देसाई म्हणाले.

यावेळी चेअरमन यशराज देसाई यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना हंगामाची तयारी आणि व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. मजूर यंत्रणा कार्यक्षेत्रात दाखल झाली असून गळीत हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज दादा देसाई, कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.