कुंभारगांव | राजेंद्र पुजारी:
कुंभारगांव (ता. पाटण) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची वार्षिक यात्रा १५ आणि १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पारंपारिक पद्धतीने, शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यात्रेसाठी मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करत यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी धार्मिक विधी पार पाडले. त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री १५ नोव्हेंबरला पहाटे श्री लक्ष्मी अंबाबाई देवीचे अभिषेक आणि काकडा आरतीने,मानाचे दंडस्तान याने यात्रा प्रारंभ झाला.
या दिवशी मंदिरात नवस फेडण्यासाठी माहेरवाशीण, लेकी, सूना, आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर देवीला नवस फेडण्याचा आणि भक्तिपूर्वक धार्मिक विधी पार पडला. संध्याकाळी देवीच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले, या वेळी ग्रामस्थ, युवक वर्ग, भाविक व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, १६ नोव्हेंबरला, कुंभारगांव परिसरातील विविध वाड्यांमधून (जसे की गलमेवाडी, शेंडेवाडी, जांभुळवाडी, चाळकेवाडी, मान्याचीवाडी, यादववाडी, बामणवाडी, भैरवदरा इ.) पालखी मिरवणुका गावाच्या वेशीवर रात्री दाखल झाल्या. यावेळी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी पालख्या व देवतांचे भव्य स्वागत केले.
सकाळी ७ ते ११ पर्यंत, मुख्य दिवसाच्या मिरवणुकीत एकूण ९ पालख्या सजवण्यात आल्या. सासन काठी ढोल-ताश्याच्या तालावर युवक-युवती बेधुंद नाचत मिरवणुकीत सामील झाले. मिरवणुकीत देव, देवता पालखीचे मानकरी यांना बिस्लरी पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. या वेळी मानकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. मिरवणुकीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली.
तसेच ग्रामदेवता श्री लक्ष्मी अंबाबाई देवी यात्रेची पाकाळणी (भंडारा) शुक्रवार दिनांक 22/११/२०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
यात्रेचा दोन दिवसांचा कार्यक्रम शांततेत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांचे योग्य नियोजन आणि ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे API डॉ. प्रवीण दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, यात्रा सुरळीत पार पडली.