म्हासोलीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून बचतगटांसाठी मिळाली इमारत

जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम ; इमारतीसाठी आमदार निधीतून तरतूद.



म्हासोली : येथील राजमाता ग्रामसंघाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समवेत अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गावस्तरावर महिलांना आपले मत व विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसंघाचे कार्यालय असून, जिल्ह्यामधील बहुतांश ग्रामपंचायतींनी गावातील ग्रामसंघाकरिता जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, गावस्तरावरील काही वापरात नसलेल्या इमारती डागडुजी करून खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु म्हासोली (ता. कराड) गावच्या सरपंच सुमती शेवाळे यांच्या पुढाकाराने व वंदना पाटील, वर्षा कुंभार तसेच ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे उमेद संलग्न असलेल्या राजमाता ग्रामसंघास नवीन इमारतीची मागणी केली होती.

त्यानुसार आ. चव्हाण यांनी मागणीची दखल घेवून स्थानिक विकास निधीतून सात लाख रूपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्यात आली असून, सदरच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा व भव्य महिला मेळावा नुकताच संपन्न झाला. आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, सुजाता पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

महिलांना आत्मनिर्भर करण्याकरीता शासनाच्या वेगवेगळ्या विभागांकडून विविध योजना राबविण्यात येत असून, उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी व ग्रामसंघाचे आर्थिक कामकाज सुव्यवस्थीत करण्याकरिता या कार्यालयाचा उपयोग म्हासोली परिसरातील २२ गटातील २४२ महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून होणार आहे. 

आमदार निधीतून बहुतांश मतदार संघातील रस्ते.शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा योजना यावर भर दिला जातो. परंतु म्हासोलीमध्ये महिलांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामसंघाच्या इमारतीकरिता निधी देण्याचा नवीन पॅटर्न तयार झाला असून, जिल्ह्यातील इतर १२०३ ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी व आदर्शवत ठरत आहे. 

गौरी शेवाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर उपसरपंच विनय पाटील यांनी आभार मानले. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अशोक चव्हाण, पाटीलवाडीचे माजी सरपंच अर्जुन शेवाळे, म्हासोलीचे उपसरपंच विनय पाटील यांनी संयोजन केले. कार्यक्रमास म्हासोलीसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

______________________________

 पार्ले (ता. कराड) येथे आ. पृथ्वीराज चव्हाण व माजी आ. मोहनराव कदम यांच्या पुढाकाराने जनसुविधा व वित्त आयोग निधीतून अशा पद्धतीची ग्रामसंघासाठी इमारत उभारली असून, यामुळे महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 जिल्ह्यातील बचतगट चळवळीची स्थिती अशी.......

- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात २२ हजार ८०४ स्वयंसहाय्यता समुह.
- या माध्यमातून २ लाख ३५ हजार महिलांचे संघटन करण्यात आले आहे.
- कराड तालुक्यातही ३ हजार ७७८ समुहांच्या माध्यमातून ३७ हजारांहून अधिक ग्रामीण भागातील महिला उमेद अभीयानाशी जोडल्या गेल्या आहेत.
- गावस्तरील गटांचे संघटन करून ग्रामसंघ तयार करण्यात आले असून, जिल्ह्यात एकूण १२०४ ग्रामसंघ असून, पैकी कराड तालुक्यात १७२ ग्रामसंघ आहेत.
- तालुक्यात जिल्हा परिषद प्रभाग स्तरावरील १२ प्रभाग असून, हीच संख्या सातारा जिल्ह्यात ६२ एवढी आहे.

______________________________