वंचित बहुजन आघाडीची विधानसभेची मोठी तयारी – कराड दक्षिण मध्ये या उमेदवाराची घोषणा


कराड प्रतिनिधी: विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी आणखी विस्तारली आहे. शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १६ नव्या उमेदवारांची घोषणा केली. या यादीत सातारा जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून संजय गाडे, तर कोरेगाव मतदारसंघातून चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून रिंगणात उतरतील, तर भाजपकडून डॉ.अतुल भोसले यांची जोरदार स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत संजय गाडे यांचा ‘वंचित’कडून प्रवेश हा निवडणुकीला एक नवीन कलाटणी देईल. कोरेगावमध्ये चंद्रकांत कांबळे यांना निवडणुकीची माळ मिळाली असून, ते देखील चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या दुसऱ्या यादीत माण मतदारसंघासाठी इम्तियाज नदाफ यांना संधी देण्यात आली आहे. आघाडीने यापूर्वीही सातारा जिल्ह्यात तीन उमेदवार जाहीर केले होते. वंचितने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत ते उमेदवार उभे करतील आणि उर्वरित मतदारसंघातील नावे लवकरच घोषित केली जातील.

विधानसभेच्या रणसंग्रामात वंचित बहुजन आघाडीची रणनीती अधिक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र आहे.