कराड शहर पोलिसांची दमदार कामगिरी: घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस, 11 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: कराड शहरातील अगाशिवनगर,अयोध्यानगरी आणि शास्त्रीनगर, मलकापूर येथे सप्टेंबर महिन्यात दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अशोक भापकर आणि त्यांच्या पथकाने याप्रकरणी कसून तपास करत, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे मिरज, सांगली येथून संशयिताला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान, परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी, ता. विजापूर, कर्नाटक) या आरोपीने मलकापूर आणि अगाशिवनगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून एकूण 11 लाख 16 हजार रुपये किमतीचे, सुमारे 15.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्याकडून इतर गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता आहे.

या यशस्वी तपासात पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार (कराड शहर पोलीस ठाणे) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या तपासात सपोनि अशोक भापकर, सपोनि श्रद्धा आंबले, पोउनि भंडारे, निखिल मगदूम, पोह शशी काळे, अमित पवार, अशोक वाडकर, अनिल स्वामी, कुलदीप कोळी, संदीप कुंभार, पोशि अमोल देशमुख, धिरज कोरडे, मोहसीन मोमीन, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, हर्षल सुखदेव, आनंदा जाधव, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, सपना साळुंखे, आणि सोनाली पिसाळ यांनी विशेष कामगिरी बजावली.