महाराष्ट्र राज्याची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे अपयशी होत चाललेली आहे. सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये अपूर्ण शिक्षक व प्राध्यापक भरती,शाळा महाविद्यालयामध्ये शिपाई,वॉचमन, महिला वॉचमन यांची भरती पूर्ण बंद करून महाराष्ट्रातून 52 हजार पदे कायमची बंद करण्यात आली, म्हणजे शाळा महाविद्यालयांना विद्यार्थिनी, शिक्षिका,स्त्री पालक वर्ग यांचे संरक्षण करणे त्यांना संरक्षित वाटेल असे वातावरण होणे अशक्य होत चालले आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत विद्यार्थिनी,शिक्षिका व स्त्रियांच्या बाबतीत घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत.त्याला जबाबदार कोण? तर त्यास आपणच सर्व जबाबदार आहोत याचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे. शिक्षणामधून विद्यार्थी व समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे आणि ते काम शिक्षक, शिक्षिका व प्राध्यापक यांचे आहे, पण त्यासाठी शिक्षक, प्राध्यापक या संबंध प्रवर्गाला पुरेसे वेतन,पुरेशा सुविधा, नोकरीतील शाश्वती, पुरेसा शिक्षक वर्ग व शैक्षणिक व्यवस्थेतील सहाय्यक कर्मचारी वर्ग मिळाला पाहिजे.
आज घडीला या व्यवस्थेतील शिक्षक हा घटक असाहाय्य झाला आहे. शालाबाह्य कामे मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर लादली जात आहेत.त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक भरती केली जात नाही, शिक्षण क्षेत्रातून शासन अंग काढून घेत आहे. जिल्हा परिषदेची शाळा, शासकीय शाळा,खाजगी संस्थांची अनुदानित शाळा महाविद्यालये कमी होत चाललेली आहेत.त्याऐवजी कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहित शाळा महाविद्यालये दिली जात आहेत.
विद्यार्थ्यांना फी भरून शिकावे लागणार आहे म्हणजे समाजात गरीब विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालये वेगळी व श्रीमंतांची शाळा महाविद्यालये वेगळी.असे चित्र निर्माण होत चालले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशामध्ये व महाराष्ट्रात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. खरोखरच आपण शिक्षकांचे प्रति संवेदनशील आहोत का? याचा विचार पालक, पुढारी,राजकीय पक्ष,शासन व शासकीय अधिकारी यांनी करावा.