कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
गुरुवारी रात्री सुमारे 1 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान कुंभारगावच्या इसवरदरा, मडदरा, जगूटेक, आणि माळ या शिवारांमध्ये आकाशात सहा ड्रोन घिरट्या घालताना दिसले. प्रत्यक्षदर्शी मधुकर मोहिते यांनी ही घटना पाहिली, पण रात्रीच्या त्या एकाकी वेळेत घराबाहेर येऊन व्हिडिओ शूट करण्याचे धाडस त्यांना झाले नाही. त्यानंतर, शुक्रवारी रात्री कळंत्रेवाडी येथे दोन ड्रोन आकाशात फिरताना नागरिकांनी पाहिले. यावेळी एका नागरिकाने ड्रोनचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ड्रोन अचानक गायब झाले. त्यामुळे हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरला आहे.
परिसरात चर्चा आणि नागरिकांमध्ये चिंतेची लाट
डोंगरी भागात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी ड्रोन दिसल्याने गावभर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. काही नागरिकांचा विश्वास आहे की या ड्रोनचा वापर चोरट्यांकडून होतो, जे मौल्यवान वस्तू असलेल्या घरांची टेहळणी करतात आणि त्यांची जागा निश्चित करतात. तर काहीजणांच्या मते, हे सरकारी ड्रोन असावेत, जे काही सर्वेक्षणासाठी वापरले जात असतील. परंतु नागरिकांना प्रश्न पडतो की सर्वेक्षण जर करायचेच असेल, तर ते दिवसा का नाही केले जात? अश्या चर्चा नागरीकांमध्ये होताना दिसत आहेत.
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. "रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या या ड्रोनमागील रहस्याचा शोध लावावा आणि नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करावी," अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन या घटनेचा तपास सुरू होण्याची अपेक्षा आहे. रहस्यमय पद्धतीने गायब होणारे ड्रोन आणि त्यांच्या घिरट्यांनी नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता या घटनेचा खुलासा कधी होतो आणि पोलिस प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागलेले आहे.