गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजविण्यास बंदी ! ढेबेवाडी पोलिसांचा कारवाईचा इशारा


कुंभारगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा 
गणेशोत्सवात ढेबेवाडी विभागात कुठेही डीजे व डॉल्बी वाजविण्याला परवानगी नसल्याचे ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे नूतन API प्रवीण दाईगडे यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सव विभागात शांततेमध्ये व आदर्शवत पार पडावा याकरिता ढेबेवाडी विभागातील गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील यांची आढावा बैठक नुकतीच कुंभारगांव येथील सांस्कृतिक भवन येथे पार पडली.

यावेळी ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस प्रशांत चव्हाण, तळमावले बिटचे प्रशांत माने, कुंभारगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, पोलीस पाटील अमोल गायकवाड, अमित शिंदे, प्रवीण मोरे, महादेव वरेकर, प्रसाद कांबळे, विक्रम वरेकर तसेच कुंभारगांव विभागातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधीकारी उपस्थित होते.



 यावेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे API प्रवीण दाईगडे बोलताना म्हणाले की सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक वाध्येच वाजवावीत तसेच एक गांव एक गणपती, समाजहित देखावे, आरोग्य शिबीर असे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळाना दर वर्षीप्रमाणे गणराया अवार्ड दिला जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी लागणारी परवानगी ऑनलाईन अर्ज करून तसेच पोलीस स्टेशन कडून घ्यावी. गणेश मंडळांनी डॉल्बी लावण्याचे धाडस करू नये तसे निदर्शास आल्यास डॉल्बी जप्त करून डॉल्बी मालक व गणेश मंडळे यांचेवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

तसेच गणेशोत्सव काळात सोशल मिडियावर सायबर क्राईमची करडी नजर असणार आहे. सोशल मिडीयाचा वापर करताना समाज हित जोपासावे व जातीय सलोखा राखला जाईल याची मंडळांनी दक्षता घ्यावी शासनाच्या नियमाचे पालन करत श्री गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन ढेबेवाडी पोलिसांनी केले आहे. 

या वेळी गणेश मंडळाच्या बैठकीचे प्रास्ताविक व आभार पोलीस पाटील अमित शिंदे यांनी मानले.