पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
2.50 लाखापेक्षा कमी उत्पन्न गटातील 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी हो योजना असून ह्या योजनेत अशा महिलांना दरमहा 1500 रू मिळणार आहेत. ह्या योजनेसाठी विवाहित ,विधवा घटस्फोटित,परितक्त्या व निराधार महिला पात्र ठरणार असून यासाठी अर्ज करण्याची मुदत 1जुलै ते 15 जुलै अशी असणार आहे
यासाठी उत्पन्नाचा दाखला,आधार कार्ड रेशन कार्ड,रहिवासी दाखला ,बँक पासबुक आदी कागदपत्राची आवश्यकता लागणार असून अशा पात्र महिलांचे अर्ज महा ई सेवा केंद्र आपले सरकार केंद्र,अंगणवाडी सेविका ,ग्रामपंचायत कार्यालय,ग्रामसेवक यांचे मार्फत स्वीकारले जाणार आहे.
पाटण तालुक्यात ह्या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना ह्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक महसुल प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तहसीलदार अनंत गुरव व प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी महा ई सेवा केंद्र चालक ,आपले सरकार केंद्र चालक तलाठी ,मंडळ अधिकारी यांची बैठक घेऊन आवश्यक ते नियोजन करत आहेत. याकरिता रात्री उशिरा पर्यंत बसून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी महसूल प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरावर देखील याबाबत नियोजन सुरू असून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने पाटण मध्ये कागदपत्र प्राप्त करण्यासाठी तसेच योजनेची माहिती घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते.
या योजनेमुळे पाटण सारख्या दुर्गम भागातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक उत्पंनाचे कुठलेही खात्रीशीर साधन नसल्याने दरमहा 1500 रू मिळणार असल्याने त्यांना निश्चितपणे दिलासा मिळणार आहे.त्यामुळे या योजनेमुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर कोणत्याही योजनेचा लाभ न मिळणाऱ्या महिलांच्या अपेक्षा या योजनेमुळे निश्चितपणे उंचावल्या असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
___________________________________
"पाटण मध्ये सध्या 18 वर्षांवरील एकूण 3 लक्ष मतदार असून त्यापैकी सुमारे 1.50 लक्ष महिला मतदार आहेत .21 ते 60 हा वयोगट लक्षात घेतल्यास पाटण मध्ये जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देणे शक्य असून तो देण्याचा दृष्टीने आम्ही नियोजन केले असून एकही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही यासाठी पुढील काही दिवस वेळ पडली तर 24 तास प्रयत्नाची शिकस्त करू"
सुनील गाढे प्रांताधिकारी पाटण
___________________________________