कोयनानगर परिसरातील मिरगाव येथे २०२१ मध्ये भूस्खलन झालेल्या ठिकाणी प्रांत अधिकारी यांनी रात्री अचानक केली पाहणी


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसरामध्ये मिरगाव या गावी सन जुलै २०२१ मध्ये भूस्खलन झाले होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. या भूस्खलना दरम्यान कोयनानगर परिसरातील मिरगाव येथील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांचे तात्पुरते पुनर्वसन कोयनानगर येथील 150 निवारा शेडमध्ये पुनर्वसन केले असून त्या ठिकाणी भूस्खलन बाधित कुटुंब राहत आहेत तथापि मिरगाव या गावांमध्ये अजूनही काही घरे सुस्थितीत असल्याने काही कुटुंब त्या ठिकाणी शेती कामासाठी जात असतात. सध्या पाटण तालुक्यात कोयना धरण क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असून पावसाचे संततधार गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू आहे मिरगाव येथे देखील पावसाचे संततधार सुरू आहे.

 या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई तसेच जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांनी जिल्हास्तरावर आज क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन संभाव्य भूस्खलन बाधित होणारे ठिकाण किंवा यापूर्वी भूस्खलन झालेल्या ठिकाणी अतिवृष्टी सुरू असताना देखील कोणी कुटुंब किंवा काही व्यक्ती तिथे राहत तर नाही ना याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते .

त्यास अनुसरून काल संध्याकाळी उशिराने पाटण तालुक्याचे तहसीलदार अनंत गुरव तसेच प्रांत अधिकारी सुनील गाडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री शिंदे यांनी अचानक मिरगाव येथे पूर्वी सन 2021 मध्ये भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सदर गावामध्ये कोणीही व्यक्ती राहण्यास नसल्याचे दिसून आले तसेच जी काही घरे सुस्थितीत होती ते देखील कुलूप बंद असल्याने त्या ठिकाणी कोणीही राहत नाही याबाबतची खात्री केल्यानंतरच महसूल प्रशासन त्या ठिकाणाहून परत निघाले .

संभाव्य भूस्खलन होणारी ठिकाणे किंवा त्यापूर्वी भूस्खलन झालेल्या ठिकाणच्या कुटुंबाने अतिवृष्टी किंवा पाऊस सुरू असताना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे .तसेच ज्यांची निवारा शेडमध्ये सोय केलेली आहे त्यांनी निवारा शेड मध्येच रहावे ,मुळ ठिकाणी किंवा गावात कोणत्याही कारणांस्तव जाऊ नये असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.