कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे दीड फूट उचलले; 10 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु


कोयनानगर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे. यावेळी एक घटना घडली त्यामुळे धरणाचे दरवाजे उडण्यास एक तास उशीर झाला. मुसळधार पावसामुळे सायं. 7 वाजता आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

कोयना धरण क्षेत्रात पावसाबरोबर वाऱ्याचाही जोर असल्यामुळे धक्क्याच्या ठिकाणी बांधून ठेवलेली गृह विभागाची बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुटून धरणाच्या दरवाज्याजवळ आल्यामुळे दरवाजे उघडण्यास अडचणी आल्या. आणि दरवाजे पाच वाजण्याच्या सुमारास उचलण्यात आले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा 78.29 टीएमसी झाला आहे. तर धरण 74.38 टक्के भरले असून धरणात 85 हजार 937 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.