कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज, सैदापूर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी बोलत होते. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाविद्यालयचे प्राचार्य देशमाने, इंद्रजित चव्हाण, नानासो जाधव, मानसिंग जाधव, तानाजी माळी, विवेक जाधव, प्रा.प्रमोद माने, प्रा.पवार, प्रा.गायकवाड, प्रा.पिसे आदिसह विद्यार्थी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना तंत्रज्ञान चा अभ्यास कुतूहलाने केला पाहिजे. आज भारतातील उद्योग क्षेत्राचा वाटा अर्थव्यवस्थेच्या 27-28% आहे. तर सेवा क्षेत्राचा जवळपास 60% आहे. आपल्या देशात 17% निर्मिती क्षेत्र असून ते किमान 25% पर्यंत नेण्याची आवश्यकता आहे तर आपल्याला चीन सारख्या देशावर अवलंबून रहावे लागणार नाही. चीन मध्ये निर्मिती क्षेत्र जवळपास 30% इतके आहे. कुशल मनुष्यबळ असेल तर निर्मिती क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते.
भारतात सेमिकंडक्टर चा उद्योग झाला पाहिजे. कारण बरेच तंत्रज्ञान विकसित झाले असून ते सेमिकंडक्टर मुळे प्रगत झाले आहे. ड्राइवर विरहित कार असतील किंवा इलेक्ट्रिक वाहने ही सर्व सेमिकंडक्टर ची किमया आहे. आपल्या देशात जवळपास दीड कोटी रोजगार निर्मिती दरवर्षी झाली पाहिजे तर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. तसेच अर्थव्यवस्थेचा विकासदर हा किमान 8-9% इतका झाला पाहिजे तरच दरडोई उत्पन्न वाढेल. पण सद्या आपल्या देशाची तशी परिस्थिती नाही, अर्थव्यवस्था दर तितका नाही त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढले तरच देश विकसित होण्यास मदत होईल.