लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीच म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये येणार की नाही हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल. तसेच शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साताऱ्याला आमची सांगता सभा झाली होती. त्यावेळी शरद पवार यांनी ती मुलाखत दिली होती. त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो. माझ्यासमोरच मुलाखत झाली. त्यांनी मांडलेलं मत त्यांचं व्यक्तिगत आहे. त्यांनी दोन गोष्टी मांडल्या. त्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत विचाराचा फरक नाहीये. हे जगजाहीर आहे. आमचे काँग्रेससोबत वैचारिक मतभेद नाही. सहकाऱ्यांना विचारून पक्ष विलिनीकरणाचा निर्णय होईल असं शरद पवार म्हणाले होते. पक्ष विलिनिकरणाच्या मुद्दयावर त्यांनी नाही असं म्हटलं नाही. हे महत्त्वाचं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पवारांनी काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे. निवडणुकीच्या निकालावर बरेचसं अवलंबून राहील. मला काय वाटतं ते अलाहिदा आहे. मला वाटतं निवडणूक निकालानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असंही ते म्हणाले.
तर भाजपसोबत राहतील....
त्याचबरोबर शरद पवारांनी दुसरं भाष्य केलं. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये येतील. तसेच काँग्रेसला साथ देतील. मला असं वाटतं की, हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल. दिल्लीत सत्ता कुणाची येईल? त्यावर सर्व ठरेल. इंडिया आघाडीची सत्ता आली तर पवार म्हणतात तसे होईल. अनेक छोटे पक्ष सत्तेचा लाभ घेण्यासाठी इंडिया आघाडीत येतील. पण विरोधी निकाल लागला… विरोधी निकाल जाईल असं वाटत नाही. पण समजा लागला तर छोटे पक्ष भाजपसोबत राहतील, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मोदींविरोधात सुप्त लाट : आ.पृथ्वीराज चव्हाण
नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिगत विरोधात सुप्त लाट आहे. भाजपच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या बाजूने ही लाट आहे असं नाही. पण मोदींच्या विरोधात लाट आहे. मोदींनी अर्थव्यवस्था व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळे बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न निर्माण झाला. ते शेतकऱ्यांच्या विरोधात नेहमी निर्णय घेतात. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. भ्रष्टाचार तर खुलेआम सुरू आहे. निवडून आलेली सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. साम, दाम, दंड, भेद वापरले गेले. पैशाचा वापर झाला. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. आमदार गेले तरी मतदार गेले का? हे 4 जूनला माहिती पडेल, असं त्यांनी सांगितलं.