पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाटण मध्ये प्रशासकीय तयारी जोरात सुरू असून पाटण विधानसभा मतदारसंघात सुमारे 409 मतदान केंद्र असून 2.99 लक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. पाटण विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण 2260 कर्मचारी यांची आवश्यकता असून स्थानिक महिला वगळता उर्वरित कर्मचारी हे जिल्ह्यातील अन्य तालुक्या मधून येणार आहेत.जिल्ह्यात सर्वत्र प्रथम प्रशिक्षण एप्रिल चे पहिल्या आठवड्यात झाले असून दुसरे प्रशिक्षण पाटण मध्ये 25 व 27 एप्रिल ला अडुळ येथील खाजगी मंगल कार्यालयात घेण्यात येणार आहे. 85 वर्षांवरील वृध्द व अपंग यांचेसाठी त्यांचे घरी जाऊन टपाली मतदान करू. घेण्याची सुविधा करण्यात आली असून पाटण मध्ये सुमारे 224 वृध्द व्यक्ती व 53 अपंग व्यक्तींचे मतदान त्यांचे घरी जाऊन दिनांक 1 में व 2 मे रोजी करण्यात येणार आहे.त्याबाबत आज पाटण मधील स्थानिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना बैठक घेऊन सुनील गाढेयांनी माहिती दिली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी ई व्ही एम यंत्र तयार करण्याची प्रक्रिया 28 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथे पार पाडण्यात येणार आहे.
रासाटी येथील मतदान केंद्रावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बाबत ची माहिती तसेच कोयनानगर येथील केंद्रावर कोयना धरणा बाबत चे फोटो व छायाचित्र लावण्यात येणार आहे. याशिवाय पाटण मधील एक व विहे गावातील एक मतदान केंद्र हे पूर्णपणे महिला द्वारे संचालित करण्यात येणार असून दीव्यांग हे देखील कोंजवडे येथील केंद्रावर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत. मतदान प्रक्रियेआधी 5 दिवस तालुक्यातील मतदारांना voter information slip चे वाटप BLO मार्फत करण्यात येत आहे.
तालुक्यात चार ठिकाणी स्थिर निगराणी पथक ,तर 8 भरारी पथके कार्यान्वित आहेत.पाटण विधान सभा मतदार संघात आतापर्यंत 6 सभाना परवानगी देण्यात आल्या असून 5 वाहनाचे परवाने निर्गमित करण्यात आल्याची माहिती सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. तालुक्यात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमल बजावणी सुरू असून किरकोळ स्वरूपाच्या दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबत उचित कार्यवाही करण्यात आलेली आहे.
स्वीप मार्फत मोठ्या प्रमाणात तालुक्याच्या दुर्गम भागात जनजागृती सुरू असून तालुक्याच्या ठिकाणी देखील सेल्फी पॉइंट ,मानवी साखळी ,पथनाट्य, स्वाक्षरी मोहीम, विविध पोस्टर्स व बॅनर्स मार्फत मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे.
पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने ह्या ठिकाणी काही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही आव्हाने असली तरी मां निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 45 सातारा लोकसभा मतदारसंघ श्री जितेंद्र डूडी यांचे मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पाटण तालुक्यातील प्रशासन सज्ज असल्याची माहिती सह निवडणूक निर्णय अधिकारी पाटण यांनी दिली आहे.
-----------------------------------------------------------------
पाटण मध्ये 8 मतदान केंद्र ही अती दुर्गम भागात असून त्याठिकाणी मतदान केंद्राजवळ मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने त्याठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून अशा केंद्राच्या जवळच्या परिसरात ज्या ठिकाणी रेंज येते त्या ठिकाणी एक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी रनर ची पण व्यवस्था करण्यात आली असून क्षेत्रीय अधिकारी तसेच पोलीस विभाग देखील या केंद्रावर विशेष लक्ष ठेऊन राहणार आहेत.
---------------------------------------------------------------