वाल्मिक पठारावर बिबट्याची दहशत.
वांग खोर्यातील वाल्मिक पठारावरील अतिदुर्गम अशा तामीणे ता.पाटण येथे भर वस्तीत रात्री साडेअकरा ते बारा वाजले चे दरम्यान कुत्र्याच्या वासाने डोंगरातून मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याने शेडात झोपलेल्या वयोवृद्ध 75 वर्षीय शेतकऱ्यांवर हल्ला करत त्यांना आपल्या अणकुचीदार नख्यानी डोक्याला ओरबाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने संपूर्ण वाल्मिक पठार हादरून गेला असून सर्व गावांत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत तामीणे ता.पाटण चे संरपच कैलास साळुंखे यांनी दिलेली माहिती अशी, गावातील अतिशय गरीब परिस्थितीत असलेले आप्पा रासू साळुंखे वय 75 हे जेवण करून घरातील शेडात झोपले होते तेथे थोड्याच अंतरावर पाळीव जनावरे बांधली होती. रात्री 11 ते 12 चे दरम्यान कुत्र्याच्या वासाने भुकेला बिबट्या मानवी वस्तीत शिरला. सांळुखे यांच्या शेडाजवळ येताच डोक्याने ढोसणी देवून ताटयाचा दरवाजा खाडकन उघडला गेला. काळोख्यात पुढील काहीच दिसत नव्हते पण सावध झालेली जनावरे अचानक पणे मोठ मोठयाने हंबरू लागली. त्यामुळे आप्पा सांळुखे यांची झोप उडाली त्यानी जवळ असलेली इलेक्ट्रॉनिक बॅटरी चा प्रकाश समोर मारला असता त्यांना बिबट्या दिसला. परंतू डोळ्यावर प्रकाश पडताच त्या दिशेने बिबट्या झेप घेत आपल्या अणकुचीदार नख्यांनी सांळुखे यांच्या डोक्यावर ओरबाडून काढत त्यांना गंभीर जखमी केले.
नखे लागल्याने सांळुखे मोठमोठ्याने ओरडू लागले. त्याच्या ओरडण्याने आजूबाजूच्या लोकाना जाग येवून झोपेतच पळत ते सांळुखे यांच्या शेडाकडे आले. मोठमोठ्याने ओरडत आलेल्या लोकाचा आवाज बिबट्या ने सांळुखे यांना जखमी करत काळोखात धूम ठोकली.
सांळुखे हे जखमी झाल्याचे समजताच तामीने ता.पाटण गावचे सरपंच कैलास सांळुखे यांनी त्वरित ढेबेवाडी फॉरेस्ट मधील हवालदार अमृत पन्हाळे यांना खबर दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वाहनाने हवालदार तामीनेला रवाना झाले. तेथे जखमी शेतकऱ्याची अवस्था पाहून त्यानी लगेच ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात फोन करून त्याना कल्पना दिली. त्याच वाहनाने परत येवून सांळुखे ना दवाखान्यात उपचाराकरिता ऍडमिट केले.त्याच्यावर उपचार करून त्याना आज सकाळी आठ वाजता घरी सोडण्यात आले. डोंगरमाथ्यावर गवत जळुण गेल्याने भुकेने व्याकूळ हिंस्र श्वापदांनी आता मानवी वस्ती कडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळेच वाल्मिक पठारावरील सर्वच गावात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.