वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वडिलांच्या स्मृती चित्ररुपाने जतन करण्यासाठी विद्यार्थी व चित्रकारांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. चित्रांच्या स्वरुपातून तात्याच्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्याची या स्पर्धेची संकल्पनाही अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. वास्तविक आपल्या आई-वडिलांचे ऋण आपण आयुष्यामध्ये कधीही फेडू शकत नाही इतके ते अनंत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून दिवगंत वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.

       इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी हा एक गट तसेच त्यावरील खुला गट अशा 2 गटांमध्ये ही चित्रकला स्पर्धा घेतली जात असून दोन्ही गटासाठी तात्यांचे व्यक्तिचित्र किंवा त्यांच्या जीवनचरित्रातील एक प्रसंग असे दोन विषय आहेत. तात्यांचे फोटो https://heyzine-com/flip&book/f136f23f07-html या लिंकवर तर त्यांचे जीवनचरित्र https://heyzine-com/flip&book/5832f2afe6-html या लिंकवर उपलब्ध आहे. स्पर्धेला आलेल्या सर्व चित्रांचे प्रदर्शन स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनी मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा येथे भरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मुल्य नाही. ए फोर साईज किंवा त्यापेक्षा मोठा पेपर आणि कोणत्याही प्रकारचे रंग माध्यम चालेल. चित्राचा चांगला फोटो 9764061633 या व्हाॅटसअप नंबर वर किंवा sandeepdakve@gmail.com या ईमेलला पाठवावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. बक्षीस पात्र चित्र आयोजकांकडे जमा करावे लागेल आणि त्या चित्राचे संपूर्ण हक्क आयोजकांचे असतील. दोन्ही गटातील 3 आकर्षक कलाकृतींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ‘प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड’ देण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येईल. चित्र पाठवण्याची अंतिम मुदत शनिवार दि.30 ऑगस्ट, 2024 अशी असून निकाल रविवार दि.1 सप्टेंबर, 2024 रोजी जाहीर केला जाईल.

     या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

_________________________________

अभिनव उपक्रमाची परंपरा

राजाराम डाकवे यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ. पुस्तकांची प्रकाशने, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे अभिनव उपक्रम राबवत तात्यांच्या सामाजिक कार्याला एकप्रकारे वंदनच केले.

_________________________________