वृक्षतोड करणाऱ्यांना अभय कोणाचे ?

कराड, पाटण तालुक्यात अवैध वृक्षतोड जोमात ; वनविभाग कोमात



ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कराड पाटण तालुक्यात अवैध वृक्षतोड ही वनक्षेत्राच्या मुळावर उठली आहे.विशेषता ढेबेवाडी- काळगावं विभागात खासगी तसेच राखीव वनक्षेत्रात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येते. पेट्रोल कट्टरचा वापर करून सहज रित्या वृक्ष तोडीचे प्रमाण वाढले आहे काही स्थानिक नागरिक व काही वेळा वनविभागाची पडद्यामागची छुपी भ्रष्टाचारी यामुळे ही समस्या ओढवली आहे. गेल्या काही वर्षांत हजारो वृक्षांची अवैधरीत्या तोड झाली आहे यात सागाची सर्वात जास्त वृक्षाची तोड झाली मात्र अनेक वर्षे जुने वृक्ष जमीन सुधारणेच्या नावाखाली बेकायदेशीर विनापरवाना, वड, पिंपळ, आंबा, फणस, लिंब , हुंबर तोडले जात आहेत. कराड पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मालकी वनक्षेत्र असल्याने खाजगी वनक्षेत्रावर मोठी वृक्षतोड होते.

इंधन, फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड करण्यात येते. कराड पाटण तसेच जिल्ह्यातील एकूण भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर सागाचे वृक्ष आढळतात. डोंगरउतारावरील रचनेमुळे हिवाळ्याच्या उत्तरार्धात व उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. यामध्ये औषधी वनसंपत्तीचा ऱ्हास होतो. या मुख्य कारणामुळे वणव्याचे बहुतांशी प्रमाण असलेल्या भागातील नागरिक वृक्ष वणव्याच्या तोंडी पडण्यापेक्षा त्याची तोड करणेच योग्य समजतात. अशा नागरिकांच्या आगळ्या वेगळ्या गैरसमजामुळे आज जिल्ह्यातील बरीचसी जंगले उनाड होण्याच्या मार्गावर आहेत. 

जिल्ह्यात साग या वृक्षाला परजिल्ह्यात मोठी मागणी होत असते; मात्र वनविभागाच्या चौक्‍यावर होणारी तपासणी, देण्यात येणारा पास अशा बाबी महत्वाच्या असतात. याचा अडथळा दुर करण्यासाठीही बऱ्याच वेळा लाकुडपती व्यावसायिकांकडून मोठ्या आमिषांना बळी पडल्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे सत्य परिस्थिती लपविण्यात येऊन जिल्ह्यातील खाजगी तसेच राखीव वनक्षेत्रातील वृक्ष संपती तोड करुन परजिल्ह्यात व परराज्यात जात आहे. 

जिल्ह्यात खासगी वनक्षेत्रात स्वार्थासाठी यामुळे मोठ्या प्रमाणात वनच्छादित क्षेत्र घटण्याचा धोका पर्यावरणाला निर्माण झाला आहे. तर राखीव वनक्षेत्रात वनपाल, वनमजुर यांची गस्ती असताना सुद्धा बेकायदा वृक्षतोडीची प्रकरणे झाली आहेत.  

तरी याचे सरासरी प्रमाण पहाता जिल्ह्यातील वनसंपत्तीचा विचार करता ते धोकादायक असल्याचे समजते.  यावरुन खाजगी वनक्षेत्रातील वृक्षतोड प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 

__________________________________
पेट्रोल कट्टरचा सर्रास होतोय वापर
मार्केट मध्ये यासाठी कोणतेही लायसन्स ,परवाना घेण्याची गरज लागत नाही ,हे कटर हाताळण्यासाठी व वापर कारण्यासाठी सोपे असल्यामुळे वृक्ष तोडण्यासाठी कुराड ,करवत याचा वापर केला जात नाही त्यामुळे पेट्रोल कटर च्या वापरासाठी बंदी घालण्यात यावी .
__________________________________