39 वर्षापूर्वी 1984 च्या ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात दुष्काळ असलेल्या व विनाअनुदानित आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर. या महाविद्यालयात अकौंटन्सीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो.
यावर्षी बीकॉम भाग एक हा वर्ग सुरू झाला होता ,या वर्गात अध्यापन करत असताना अनेक विद्यार्थी अध्ययन करत होते ,परंतु त्यापैकी एक विद्यार्थी एकाग्रतेने काळजीपूर्वक सर्व काही मन लावून ऐकावयाचा तो विद्यार्थी म्हणजे अनिल यादव होय.
काही माणसे आयुष्यात साखरे सारखी विरघळतात. अनिल यादव हे असेच एक लोभस व्यक्तिमत्व. आपल्या परीने इतरांचे काही भले करावे असा ध्यास घेतलेला एक भला माणूस म्हणजे अनिल यादव होय.
चाळीस वर्षांपूर्वी कडेपूर परिसर म्हणजे दुष्काळाचे आगर होय. पण उपजत चिवटपणाचे वरदान लाभलेला हा भाग होय.
शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, माननीय संपतराव देशमुख उर्फ आण्णा, माननीय लालासाहेब यादव उर्फ आबा, माननीय भाऊसाहेब यादव उर्फ भाऊ, आणि ग्रामस्थ यांच्या परिस्पर्शाने हे गाव शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध झाले. अन्यथा गोरगरीब घरातील अनेक लेकरं ज्ञानाच्या वाटेवर येऊच शकली नसती. परम पूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, आण्णा, आबा, भाऊसाहेब व ग्रामस्थ यांच्यामुळे गोरगरीब , होतकरू व हुशार विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची सोनेरी पहाट फुलल्या मुळे त्यांचा भाग्योदय झाला.
माझ्या आयुष्यातील बीकॉम भाग एक मध्ये प्रवेशित झालेली पहिली बॅच माझ्या हृदयाचा एक कप्पा म्हणूनच सदैव करूणेने व्यापला आहे. या बॅच मधील विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याचा यशाचा पताका पाहताना माझी छाती भरून येते. या यशाच्या दिंडीतील एक वारकरी म्हणजे सीए अनिल यादव.
अनिल हा माझा आवडता विद्यार्थी आहे, याचे कारणही तसेच आहे. अनिलचा पेहराव, वागणे व बोलण्यातील सुसंस्कृतपणा, गुरु विषयी सूसंवाद साधण्याची कला, सुंदर व वळणदार अक्षर आणि त्याच्या जगण्यातील व वागणेतील नम्रता. तो स्वतः शिकत नव्हता तर शिकत शिकत मित्रांनाही शिकवत होता. संस्काराची शिदोरी ज्याच्याकडे असते तो माणूस आयुष्याच्या कोणत्याही लढाईत यशस्वी होतोच. पण एकटे यशस्वी होणे आणि सर्वांना सोबत घेऊन यशस्वी होणे याचा आनंद वेगळाच असतो. हा आनंद अनिल अकरावी पासून घेत होता. कारण अनिलच्या अभ्यासावर संजय ,सतीश व हणमंतचे भविष्य अवलंबून होते. यासाठी अनिलचे वडील दादा ,चुलते भाऊ, नाना व डॉक्टर यांनी आपल्या जुन्या घराची माडीच त्यांच्या ताब्यात दिली होती. अनिल या सर्वांना अकौंटन्सी शिकवत होता, त्यामुळे मी जरी अकौंटन्सीचा शिक्षक असलो तरी या तिघांचा अकौंटहचा खरा शिक्षक आनिलच होता. हे तिघे एक आदर्श खेळाडू व तितकेच वात्रट म्हणून प्रसिद्ध होते. यांचे हे छंद सांभाळून अनिल यांना एक एक वर्ग पुढे नेत होता ,नव्हे नव्हे अनिल बीकॉम भाग एक ते बीकॉम भाग तीन पर्यंतच्या सर्व वर्गातील तो एक आदर्श विद्यार्थी होता.
अनिल तर माझ्या काळजाचा तुकडा होता कारण अनिल वर माझे भविष्यकालीन कार्य ठरणार होते. अनिल आणि अनिलचे सर्व कुटुंबीय व मी आठवड्यातून एकदा तरी जेवणाच्या निमित्ताने घरी एकत्र येत होतो. व अनिलच्या भविष्यावर चर्चा करत होतो. माझी घरच्यांना सारखी विनंती असायची की हा सी ए होणारा विद्यार्थी आहे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पूर्वी बीकॉम झाल्यानंतरच सी ए चा विचार केला जात होता. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन अनिलचा पुढील शिक्षणाचा प्रवास निश्चित केला व त्याला सीए साठी पुण्याला पाठवण्यात आले.
येथे नांदतात श्रमश्री, या भूमीला शरण नाही.
येथे ज्ञान गाळिते घाम, विज्ञान शरण नाही.
येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही.
या उक्तीप्रमाणे अनिल पुण्यामध्ये अहोरात्र कष्ट करत होता खरं म्हणजे माझा आवडता अनिल पुण्यामध्ये सर्व वातावरणाशी समरस होऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता कारण गावाकडचे मित्र व पुण्याचे मित्र .घरातले जेवण आणि खानावळीचे जेवण या सगळ्याची सांगड घालून तो एक एक पाऊल पुढे यशाकडे टाकत होता.पुस्तकाशी मैत्री करत होता.एक एक पाऊल पुढे टाकत टाकत तो त्याच्या ध्येयापासून तसूभरही हलला नव्हता. परिणामी माझा अनिल सीए ची डिग्री घेऊनच कडेपूर आला.
अनिल सीए झाला याचा आनंद कडेपूरवासीयांना झालाच पण त्याचबरोबर कडेपूर महाविद्यालयात आम्ही दिवाळी साजरी केली .महाविद्यालयामध्ये आनंद उत्सव साजरा केला. मला किती आनंद झाला हे मला शब्दात वर्णन करता येत नव्हते कारण कडेपूरचा माझा पहिल्या बॅचचा विद्यार्थी सीए झाला याचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि शब्दात वर्णनही करता येत नव्हता. आता आमचा अनिल, अनिल साहेब झाला होता फक्त पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना सोडून तो इतरांच्या साठी साहेब होता .आम्हा साठी मात्र आमचा अनिलच होता. त्याने आम्हा सर्वांसाठी एक वेगळी व्यासपीठ निर्माण करून दिले ते म्हणजे पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार केला. आणि आम्ही सर्वांनी वर्षातून एकदा, दोनदा स्नेह मेळावा साजरा करण्यास सुरुवात केली.
अनिल हा मित्रासोबत रमणारा एक सवंगडी होता .जीवन सुंदर जगण्यासाठी मित्राची गरज असते त्याप्रमाणे मैत्री कशी असावी, वेळेला धावून येणारी, आपल्याला समजावून घेणारी दुःखाच्या वाळवंटामध्ये देखील आनंदाचा पाझर आणणारी मैत्री असावी . अशी ही मैत्री त्याने शेवटपर्यंत जपली.दुसऱ्याच्या मनातील वादळ शमविण्याची क्षमता अनिल मध्ये होती .नाते टिकवण्याचे गुण देवाने त्याला भरभरून दिले होते, सर्व मित्रांचा गोतावळा एक संघ बांधून ठेवण्याची कला त्याच्याकडे होती, माणूस जोडणे आणि टिकून ठेवणे, याचबरोबर त्यांच्या संपर्कात राहणे, सर्वांना बरोबर घेऊन जाणे, सर्वांशी सामंजस्याने व आपुलकीने वागणे, या गुणांचा समुच्चय म्हणजे अनिल होय. हे सगळे गुण आदर्श आई-वडिलांच्याकडून अनिलला मिळाले होते.
आपण ज्या भागात लहानाचे मोठे झालो त्या भागातील माझी कॉमर्स विभागाची सर्व मित्रमंडळी ऑडिट क्षेत्राकडे यावे, स्वतःला आपल्या कार्यामध्ये सिद्ध करण्याची ताकद प्राप्त व्हावी या भावनेने आपले ऑफिस कडेपूर येथे चालू केले. यामध्ये गावातीलच मुलांना संधी दिली होती आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर विटा या ठिकाणी आपले ऑफिस ओपन केले. आणि शेवटी अनिलने कराडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
आपल्याबरोबर आपली मुलेही सुसंस्कारित होऊन याच वाटेने त्यांनी यावे ही अनिलची व संगिता वहिनीची प्रबळ इच्छा होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी संज्योती व अनुराज यांना उभयंताने घडवण्याचे प्रयत्न केले. आणि या दोन्हीही लेकरांनी सीएच्या दृष्टीने तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात दोघेही सीपीटी पास झाले. दोघांनीही त्या दृष्टीने जबरदस्त तयारी चालू केली आणि त्याच दिशेने ते प्रयत्नशील आहेत. दोघांनीही याच क्षेत्रामध्ये कार्यरत रहावे ही अनिलची आणि संगीता वहिनींची इच्छा आहे व होती.
वर्षातून कमीत कमी दोनदा आम्ही सर्व मित्रमंडळी सुखदुःखाच्या निमित्ताने एकत्र येत होतो या सर्वांना एकत्र ठेवण्याचे, एकत्र आणण्याचे ,प्रसंगी खाऊ घालण्याचे, सर्व कार्य अनिल स्वतः करत होता. हसत खेळत सर्वांनी एकत्र येण्याचा आनंद वेगळाच असतो असे त्याचे मत होते.आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने आनंदात एकत्र येत होतो. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर एकही गुरुपौर्णिमा त्यांनी चुकवली नाही असा हा माझा आदर्श विद्यार्थी होता. वहिनीनी ही गुरुपौर्णिमेचे व्रत चालू ठेवलेले आहे.
आमचे सगळ्यांचे सर्व काही आनंदात, मजेत, गमती जमती करत चालले असताना , आमच्या या मैत्रीला कोणाची नजर लागली परमेश्वराला माहित आणि अचानक निरोप येतो अनिल आजारी आहे आणि त्यांना ऍडमिट केलेले आहे. यातून आमचे साहेब बरे होऊन बाहेर येतात असे आज आम्हाला कळते आणि दुसऱ्या दिवशी माझा साहेब सर्वांना सोडून जातो या धक्क्यातून संगीता वहिनी, संज्योती, अनुराज, सर्व कुटुंबीय, व आम्ही अजूनही कोणीही सावरलेलो नाही कारण आमचा तो काळजाचा तुकडा होता तो आम्हाला पोरकं करून सोडून गेला.
त्यानंतर एक वर्षभर संगीता वहिनींना व मुलांना भेटण्याचे अथवा संपर्क साधण्याचे धाडस माझ्याच्याने झाले नाही कारण मी गुरु असून इतका खचलो असेल तर कुटुंबियांच्या अवस्था काय झाली असेल या विचारानेच माझे मन सतत अस्वस्थ होत होते.
खरे म्हणजे या काळात गरज होती वहिनींना व मुलांना समजावून सांगून उभे करण्याची त्यासाठी मी निश्चित कमी पडलो पण त्या काळात वहिनींना व मुलांना
कोणी शब्दाचा आधार दिला.
कोणी त्यांना बोलतं केलं.
कोणी त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली.
कोणी त्यांना आपले कर्तव्य काय आहे हे सांगितले.
कोणी त्यांना खुर्चीत बसण्याचे बळ दिले.
कोणी त्यांना तू लढ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासक शब्द दिले.
या काळात कोणी माया दिली, कोणी आश्वासक शब्द दिले, कोणी आत्मविश्वास निर्माण केला, कोणी बहिणीची माया दिली या सर्वांच्या ऋणात राहूनच पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच वहिनीनी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे .
असे म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे आज हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सगळ्यांनी जी काही मदत केली, त्याचं मूल्य कशातच मोजता येणार नाही. पण आपण जे केलंय त्याबद्दल मनमोकळेपणाने बोलता यावे म्हणूनच हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आपण सर्वांनी वहिनींना व मुलांना उभे राहण्यासाठी विविध प्रकारे जी मोलाची मदत केली की ज्यामुळे अनिल सरांनी उभी केलेली फर्म पूर्वीप्रमाणेच आज आनंदात उभी आहे. वहिनींना आपल्या सर्वांच्या कायम ऋणात राहण्यातच त्या स्वतःला धन्य मानतील.
शेवटी सी .ए.आनिल यादव यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो👏
प्रा.अधिकराव कणसे.