परड्यात झाले 'तात्या' पुस्तकाचे अनोखे लोकार्पण


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 'तात्या' या पुस्तकातील नायकाचा बहुतांशी वेळ शेती आणि जनावरांच्या गोठयात गेला. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डाॅ.संदीप डाकवे यांनी लिहलेल्या तात्या या पुस्तकाचे लोकार्पण त्यांच्या कुटूंबियांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसमर्थ समूहाचे शिल्पकार ॲड. जनार्दन बोत्रे, पं. स. सदस्य पंजाबराव देसाई, पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती विलास गोडांबे, शिल्पकार राजेंद्र कुंभार, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, अनिल शिंदे, प्रा. जे. एस.पाटील, प्रा. ए. बी. कणसे, आप्पासो निवडुंगे, शिवसेना तालुका प्रमुख राजेश चव्हाण, आबासाहेब बोत्रे, उमेश बोत्रे,  सुभेदार जगन्नाथ शिद्रुक, चंद्रकांत चव्हाण, मारुती ढगे, ऍड. विठ्ठलराव येळवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. हे सर्वजणच तात्यांच्या आठवणींने गलबलून गेले.

छोटया पाटीत, बारदानाचा केलेला पॅकींग पेपर व रंगीबेरंगी दोरखंडाची लेसने पुस्तके पॅकींग केली होती. हा अनोखा पुस्तक लोकार्पण सोहळा पाहून उपस्थित नातेवाईकही भारावून गेले.

वास्तविक पुस्तक प्रकाशन किंवा लोकार्पण म्हटले की, व्यासपीठ, मान्यवर, पाहुण्यांची मांदियाळी असे चित्र सर्वसामान्यपणे डोळयासमोर येते. परंतू या सर्वांचा अपवाद ठरलेले ते डाॅ.संदीप डाकवे यांचे पुस्तक लोकार्पण सोहळा. तात्यांचा शेती आणि मातीवर, प्राण्यांवर खूप जीव होता. त्यांचा बराचसा वेळ गोठयात आणि शेतामध्ये जायचा. त्यामुळे हे लोकार्पण अशाच वातावरणात करायचे असे कुटूंबियांनी ठरवले. गोठयामध्ये तात्या वापरात असलेली सुतारकामाची हत्यारे, विळा, खोळ, पाटी, वाले इ. साहित्याही ठेवण्यात आले होते. 

 दरम्यान, घराजवळ असलेल्या मक्याच्या परडयातही पुस्तक लोकार्पण केले गेले. डाॅ.डाकवे यांनी लिहलेले हे 10 वे पुस्तक आहे. याप्रसंगी प्रतिमा पूजन, वृक्षारोपण, तात्या अर्धपुतळा अनावरण, प्रसाद आणि ह.भ.प. धोंडीराम महाराज सवादेकर यांचे कीर्तन आदी कार्यक्रम संपन्न झाले. पंजाबराव देसाई, प्राचार्य जे. एस. पाटील, प्रा. ए. बी. कणसे यांनी मनोगत व्यक्त करत या पुस्तकाचे कौतुक केले. आईवडिलांच्या ऋणातून आपण उतराई होवू शकत नाही. मात्र त्यांचे अलिखित कार्य समाजापुढे मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे असे मत पुस्तकाचे लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.

तसेच डाकवे परिवाराने तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याचे मनोगतात व्यक्त केले.

 दरम्यान या सर्व मान्यवरांनी राजाराम डाकवे तात्या यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवून आदरांजली वाहिली. तात्यांच्या आकस्मिक निधनाने एक धडपडया, सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न हरपल्याची भावना यावेळी लोकांनी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल डाकवे, विश्वनाथ डाकवे, भरत डाकवे, सागर डाकवे, लव डाकवे, सुनील मुटल, अक्षय डाकवे, गणपती डाकवे, पांडुरंग जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.