पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाला ओडिशा स्पेशल टास्क फोर्सने पुण्यातून अटक केली होती. अभिजीत संजय जंबुरे, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो मूळचा सातार्यातील विहे (ता. पाटण) गावचा रहिवासी आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मूळचा पाटण तालुक्यातील विहे गावचा रहिवासी असलेला अभिजीत जंबुरे हा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस होता. २०१८ पासून तो पाकिस्तानमधील काही जणांच्या संपर्कात होता. ओटीपी विक्री आणि शेअरिंग घोटाळ्यातही त्याचा सहभाग होता. पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून त्याला ओडिशा स्पेशल टास्क फोर्सने अटक केली आहे.
संशयित अभिजीत जंबुरे याला पुण्यातून अटक केल्यानंतर ओडिशा टास्क फोर्सला न्यायालयातून त्याची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे. त्याला ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. त्याने गुजरातमधील आनंद येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सध्या तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता. पाटण पोलिसांनी अभिजीतच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली आहे.
अभिजीत जंबुरे हा फेसबुक मेसेंजरद्वारे २०१८ पासून पाकिस्तानच्या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. पाकिस्तानातील खानकी, फैसलाबाद येथील सय्यद दानिश अली नक्वी यांना २०१८ मध्ये तो भेटला होता. आपण चेग या अमेरिकन आयटी कंपनीत फ्रिलान्सर म्हणून काम करत असल्याचे त्याने सांगितले होते. अभिजीतने त्याचा युजर आयडी आणि पासवर्डही दानिशला दिला होता. दानिश हा अभिजीतच्या सल्ल्यानुसार चेगमध्ये काम करत होता, पण कमाई भारतातील अभिजितच्या खात्यात जमा होत होती.
दानिशने कराचीतील त्याचा मित्र खुर्रम अब्दुल हमीद याच्याशी अभिजीतची ओळख करून दिली. खुर्रम हा पाकिस्तानी लष्करात गुप्तचर अधिकारी आहे. त्याचे भारतात मोठे नेटवर्क आहे. अभिजीत खुर्रमच्या सूचनेनुसार भारतातील त्याच्या नेटवर्कमधील विविध पीआयओना पैसे ट्रान्सफर करण्याचे काम करत होता. व्हॉट्सॲपद्वारे किमान सात पाकिस्तानी नागरिक आणि १० नायजेरियन नागरिकांशी अभिजीतने संवाद साधला असल्याची बाब समोर आली आहे.