विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार म्हणजे त्याचे गुरु . तो गुण संपन्न, चारित्र्य संपन्न असावा. संस्था,शाळा नावा- रूपाला आणण्यासाठी संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तितकेच महत्त्वाचे घटक आहेत.गुणवत्ता ही परस्परावलंबी आहे.असे उद्गार श्री मळाई देवी शिक्षण संस्था पथक पर्यवेक्षण प्रमुख आर.ए.कुंभार यांनी काढले.
श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा महाविद्यालयांमधील इयत्ता दहावी,बारावी, सर्व स्पर्धा परीक्षा,विविध खेळ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरणाऱ्या मुख्याध्यापकांचा आगळा वेगळा गुणगौरव समारंभ नुकताच संस्थेच्या वतीने आदर्श ज्युनियर कॉलेज,मलकापूर येथे संपन्न झाला.
संस्थाप्रमुख, शेती मित्र अशोकराव थोरात शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, कौतुक हा माणसाचा जीवाभावाचा सवंगडी.तो मिळाला की एक आगळी वेगळी ऊर्जा त्याच्यामध्ये संचारते. याच निरपेक्ष विचाराने मुख्याध्यापकांचा गुणगौरव समारंभ संस्थेच्यावतीने आयोजित केला गेला. पुढे ते म्हणाले गुणवत्ता हेच आपले शस्त्र. हे शिक्षकांनी आपल्या मनावर बिंबवले पाहिजे. त्यातून नव्या पिढीला सुसंस्कारी, विद्यासंपन्न बनवून आपले ,संस्था व शाळेचे नाव नावारुपास आणावे. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
गुणगौरव सोहळ्यातील मुख्याध्यापक पवन पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले गुणवत्ता हेच आपल्या अस्तित्वाचे शस्त्र आहे. त्यांनी तुम्ही जग जिंकू शकता.प्रा. शीला पाटील, सचिन शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री आर.आर.पाटील यांनी केले. ते म्हणाले पथक पर्यवेक्षणातून शाळांना सुधारण्याची संधीच मिळते.पथक पर्यवेक्षणाकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पहावे. मुख्याध्यापकांचा गुणगौरव सोहळा हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सौ.एस.डी.खंडागळे यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.स्वाती थोरात यांनी मानले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पी.जी. पाटील, उपाध्यक्ष बी.बी.पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, वसंत चव्हाण,व्ही.एस.यादव,मळाई ग्रुप मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.