महामार्गावरील असुविधेवरून खा.श्रीनिवास पाटलांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान..!


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
टोलनाका परिसराची स्वच्छता राखून तेथे प्रवाशांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून द्यावीत. उड्डाणपूलावर व पूलाखाली पथदिवे लावावेत. महामार्गाच्या दुभाजकात फुलझाडे लावून मार्गाचे सुशोभिकरण करावे. अपघाताचा 'एस कॉर्नर' काढावा, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ ते शेंद्रे या टप्प्यातील कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या कराड कार्यालयात बैठक घेतली.

राष्‍ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक संजय कदम, पुणे-सातारा टोलचे व्यवस्थापक संजय कुमार, राकेश कोळी, ए. शर्मा, डी.योगेशाप्पा उपस्थित होते.

या वेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शेंद्रे ते शिरवळ निरा नदीपर्यंत महामार्गाच्या सेवा रस्त्याला खड्डे पडल्याने रस्त्ता खराब झाला आहे. त्याची दुरस्ती करुन हा रस्ता वहातूक योग्य करण्यात यावा. तसेच या रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचून रहात असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचा सर्व्हे करून पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.

मार्गावर पाणी साचल्याने शेतीचे नुकसान होते. पावसाळयात पाणी साचू नये यासाठी काळजी घ्या. सेवा रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांना सहकार्य करा. शेंद्रे कारखाना ते खिंडवाडी दरम्यानचा रस्ता खचला असून चाको-या पडल्या आहेत. येथून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे हा रस्ता कॉंक्रिटकरण करून दर्जा सुधारावा.

आनेवाडी टोल नाकानजीक असणाऱ्या रायगांव फाट्यावर पथदिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेत लूटमारीचे प्रकार घडत आहेत. तेथे त्वरीत पथदिवे बसविण्यात यावेत. सातारा ते शिरवळपर्यंत महामार्गावर दुचाकीसाठी वेगळी लाईन तयार करण्यात यावी. आनेवाडी टोलनाका परिसराची स्वच्छता ठेवून तेथे प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा करण्यात यावी. 

वेळे येथील नियोजित उड्डाणपूलाच्या कामाला गती द्यावी. तसेच येथील 'एस कॉर्नर' काढून बोगद्याचे काम पूर्ण करावे.