तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
व्यसनमुक्ती या एकाच विषयावर एकाच दैनिकात एका वर्षात पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी जास्तीत जास्त लेख लिहून ते प्रसिध्द केल्याबद्दल त्यांचा व्यसनमुक्ती दूत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. चंद्रभागा रुरल डेव्हलपर व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य (कार्यक्षेत्र ऑल इंडिया) सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार डाॅ.डाकवे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सुप्रसिध्द अभिनेत्री सुरेखा कुडची, भूमाता बिग्रेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई, रुरल डेव्हलपरचे दिपक लोखंडे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वरर शेवाळे व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा गुरुवार दि.18 मे, 2023 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृति सदन कराड, जि.सातारा येथे संपन्न होणार आहे.
गतवर्षी डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’ या शीर्षकांतर्गत व्यसनमुक्ती या विषयावर लेख, बातम्या, फोटो फिचर, यशोगाथा इ. लिहून त्या प्रसिध्द केल्या आहेत. याबरोबर या बातम्यांचे हस्तलिखित, बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, व्यंगचित्रे, पोस्टर प्रकाशन आदी नावीण्यपूर्ण उपक्रम डाॅ.डाकवे यांनी राबवले होते. या लेखनाची दखल घेवून डाॅ.डाकवे यांना व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय या लेखनाबद्दल आ.जयंत पाटील, आ.बाळासाहेब पाटील यांनी शुभेच्छा संदेश पाठवून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक केले आहे.
पत्रकारिता, कला आणि स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी शेकडो नावीण्यापूर्ण उपक्रम राबवले आहेत. यामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 60 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांना व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.