राज्यातील मंत्रिपदाच्या मोठ्या जबाबदाऱ्या असल्या, तरी माझ्या मतदारसंघातील जनतेवरील माझे लक्ष किंचितही कमी झालेले नाही : ना.शंभूराज देसाई

ना.शंभूराज देसाई यांचा मालदन येथील पाच ग्रामपंचायतीं तर्फे भव्य नागरी सत्कार संपन्न 



मालदन: ना. शंभूराज देसाई यांच्या भव्य नागरी सत्कार प्रसंगी यु. टी. माने, गीतांजली काळे, जोतीराज काळे, रवींद्र माने, मनीषा साबळे, विठ्ठल भिलारे, चंद्रकांत पाचपुते व इतर मान्यवर
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
'मंत्रिपदाच्या मोठ्या जबाबदाऱ्या असल्या, तरी ज्यांच्या पाठबळावर मी इथपर्यंत पोचलोय त्या माझ्या मतदारसंघातील जनतेवरील माझे लक्ष किंचितही कमी झालेले नाही. 'घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी' या उक्तीप्रमाणे भविष्यातही तुमच्यावरील माझे लक्ष आणि प्रेम असेच कायम राहील, अशा शब्दांत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी मालदन (ता. पाटण) येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थित जनतेशी संवाद साधला.

ना. देसाई यांची सातारा व ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल मालदन येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मालदन, मान्याचीवाडी, सुतारवाडी, साबळेवाडी, भिलारेवाडी या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा तसेच मालदन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, बहिरवदेव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, श्री वडजाईदेवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथील मंत्री देसाई यांचे नेतृत्व मानणाऱ्या पदाधिकारी व संचालकांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.

यावेळी ना. देसाई पुढे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, "परिवर्तन कधी सहज होत नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पश्चात मला आमदारकी मिळायला २१ वर्षे लागली. जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी २१ वर्षे मी सातत्याने संघर्ष केला. आंदोलने, उपोषणे केली. त्यात गुन्हेही दाखल झाले. अनेक प्रसंग स्वतःवर झेलले. निवडणुकांत झालेला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला. पराभवानंतर घरात बसलो नाही, दुसऱ्याच दिवशी जनतेच्या भेटीसाठी पायाला भिंगरी बांधून जनतेच्या भेटीला गेलो. अहोरात्र जनतेच्या सुख- दुःखात सहभागी होत विकासाला चालना देत राहिल्याने आज इथवर पोचता आले.

यावेळी माजी सभापती यु. टी. माने, डॉ. दिलीपराव चव्हाण यांचीही भाषणे झाली. यावेळी ना. देसाई यांचे सरपंच गीतांजली काळे, उपसरपंच जोतिराज काळे, मनीषा साबळे, विठ्ठल भिलारे, चंद्रकांत पाचुपते, जयवंत मोरे, रवींद्र माने यांनी स्वागत केले. 

यावेळी पंजाबराव देसाई, शिवाजीराव जगदाळे, राजेश चव्हाण, सर्जेराव जाधव, रणजित पाटील, मनोज मोहिते, नानासाहेब साबळे, अंकुशराव महाडिक, चंद्रकांत चाळके, अप्पासाहेब मगरे, बबनराव भिसे, मधुकर पाटील, आत्माराम पाचुपते, विकास गिरीगोसावी आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रयबापू काळे तसेच युवा नेते नितीन काळे यांचा ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 
यावेळी सरपंच रवींद्र माने यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक यशवंत काळे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक काळे यांनी आभार मानले.
_________________________________
ना.शंभूराज देसाई यांचे स्वागतासाठी तब्बल ३२ फूट लांबीचा पुष्पहार


गावच्या वेशीवर ना.शंभूराज देसाई यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यासाठी ३२ फूट लांबीचा झेंडूचा पाच पदरी आकर्षक हार बनवून आणला होता. क्रेनला अडकवलेल्या या भव्य हाराने मंत्र्यांचे स्वागत झाले. कराड येथील उमेश मानकर व त्यांच्या चार सहकाऱ्यांनी सुमारे ६० किलो फुलांपासून १६ फूट उंचीचा व ३२ फूट लांबीचा हा हार पाच तासांत तयार केला होता.
_________________________________