लाखो भाविकांच्या उपस्थितीत नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नाईकबा देवाची यात्रा "नाईकबा च्या नावानं चांगभलं "च्या गजरात आणि गुलाल खोबर्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. श्री क्षेत्र बनपूरी ता.पाटण येथील श्री नाईकबा देवाची यात्रेनिमित्त बनपुरी येथील नाईकबा डोंगरावर भक्तजनाचा जनसागर उसळला होता भाविकांच्या मध्ये मोठे उत्साहाचे वातावरण होते. यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी हजारोंच्या संख्येने स्वतः च्या, मिळेल त्या वाहनाने भक्त नाईकबाच्या डोंगरमाथ्यावर दाखल झाले होते. चैत्र शुद्ध पंचमी रविवार दि.२६ मार्च हा देवाचा नैवद्याचा दिवस तर चैत्र शुद्ध षष्ठी सोमवार दि.२७ मार्च हा याात्रेच्या मुख्य दिवशी देवाचा पालखी सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र- कर्नाटकातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बनपूरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाईकबा पठारावर ४० ते ५० सासनकाठ्यां येतात त्यात मानाची समजली जाणारी कराड येथील रैनाक व शिंदे यांच्या सासनकाठीचे गुढीपाडव्या पुर्वीच दाखल झाली होती. सासनकाठीचे कराड ते नाईकबा पठारापर्यंत जागोजागी स्वागत व पुजन करण्यात आले.


        सोमवार २७ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस होता या दिवशी पहाटे देवाचा पालखी सोहळा आणि नाईकबा च्या नावाचा गजर सुरू झाला पालखी,सासनकाट्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली.नाईकबाचा डोंगर गुलाबी रंगाने उधळून गेला होता. सासनकाठ्या वाद्यांच्या गजरात नाचवल्या जात होत्या या सोहळ्यानंतर देवाच्या दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती. मिठाईची दुकाने, हॉटेल,स्टेशनरी, खेळण्याची दुकाने,अशा अनेक दुकानाकडे यात्रेकरूंची प्रचंड गर्दी होती. यात्रेसाठी खाजगी वाहने,एस टी.बसेस,बैलगाडी, मोटरसायकल, तर काही आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी पायी येऊन प्रचंड गर्दी केली होती. महाराष्ट्र , कर्नाटक मधून मोठ्या प्रमाणावर भाविक डोंगरमाथ्यावर रविवार संध्याकाळी दाखल झाले होते. संपूर्ण परिसर नाईकबा च्या नावानं चांगभलंच्या गजरात व भजनाने दणाणून गेला होता.

          यात्रा काळात नाईकबा भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तालुका प्रशासन , ग्रामपंचायत बनपुरी,श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी व प्रमुख नागरिक आणि पोलीस विभाग, महसूल विभाग,आरोग्य विभाग, विजवितरण, बांधकाम अशा सर्व विभागानी चोख व्यवस्था ठेवली होती.       

     यात्रा काळात कोणताही अनुचितप्रकार घडू नये म्हणून ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सपोनि अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता