स्पंदन’च्या ‘सेल्फी विथ गुढी’ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुध्द प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. हिंदू नवीन वर्ष या दिवसापासून सुरु होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक हा मुहूर्त समजला जातो. त्याचे औचित्य साधत ‘चला संस्कृती जपूया’ ही टॅगलाईन घेवून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने ‘सेल्फी विथ गुढी’ ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे चौथे पर्व आहे.

सध्या अनेकजण सेल्फी काढून फेसबुक, व्हाॅटसअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड करीत असतात. सेल्फी काढण्याचा मोह तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत कुणालाही आवरता आलेला नाही. याच क्रेझचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल याचा विचार स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केला. आजही आपण आपली संस्कृती तितक्याच उत्साहाने जपत आहोत हे दर्शवण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने ‘सेल्फी विथ गुढी’ ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. ट्रस्टने आतापर्यंत राबवलेल्या प्रत्येक सामाजिक, कलात्मक उपक्रमाला समाजाच्या सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘सेल्फी विथ गुढी’ या स्पर्धेत आपण आपला सेल्फी ‘व्हाॅटसअप’ करायचा आहे. सेल्फी काढताना आपण पारंपारिक पोशाख परिधान केलेला असावा. सेल्फी मधून आपण आपली संस्कृती जपत असल्याचे दिसले पाहिजे.

सदर सेल्फी गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच बुधवार दि. 22 मार्च, 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. सदर सेल्फी पाठवताना त्यावर संपूर्ण नाव आणि पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक गौरव चिन्ह, पुस्तक आणि अभिमानपत्र देवून समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. सदर सेल्फी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांच्या 9764061633 या भ्रमणध्वनीवरती पाठवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नेहमीच नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारानी गौरवण्यात आले आहे.