पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: पाटण तालुक्यात कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र, इकोसेंसिटिव्ह झोन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प आणि आता राखीव क्षेत्रामुळे स्थानिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. संपूर्ण पाटण तालुका निर्मनुष्य करणार का? असा सवाल करून तालुक्याची संपूर्ण झोनमधून मुक्तता करावी, अन्यथा यापुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र करू,' असा इशारा पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी दिला.
हा मोर्चा कशासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, वन्यप्राणी जरूर वाचवा; पण आम्हालाही त्यांच्यापासून वाचवा, नुकसान भरपाई बाजार भावाप्रमाणेच द्या, शेतकऱ्यांवरील जाचक अटी काढा नाही तर सरकार पाडा, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्या वतीने मंगळवारी पाटण उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्या वतीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांच्यावतीने सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाटण पंचायत समिती झेंडा चौक मार्गे लायब्ररी चौक ते पाटण उपविभागीय कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा उपविभागीय कार्यालय परिसरात आल्यानंतर त्याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. अध्यक्ष राजाभाऊ शेलार म्हणाले, वन विभागाच्या जाचक अटींमुळे हा कोयना विभाग हा जात्यात आहे, उद्या हा तालुका देखील त्यात भरडला जाणार आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले आहे. तालुक्यात भविष्यात माणूस राहील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम, विक्रमबाबा पाटणकर, सुभाष पवार, सुरेश पाटील, स्नेहल जाधव यांनीही शेतकऱ्यांविषयी भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्यजीतसिंह पाटणकर, हर्षद कदम, राजाभाऊ शेलार, सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रांताधिकारी सुनील गाढे यांना निवेदन दिले. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.