तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: मालदन (ता.पाटण) येथील जागर सामाजिक परिवर्तन संस्था पर्यावरण आणि जैवविविधता यांचे सरंक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी वेळोवेळी उपक्रम राबवत असते. याच अनुशंगाने वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी व्हावा, यावरती प्रबोधन व्हावे, विचारांचा जागर व्हावा म्हणून जागार सामाजिक संस्थेने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच गौरवण्यात आले.
लहान गटामध्ये तुलसी बर्गे, अंजली जाधव, सिध्दी मोहिते यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. तर मोठया गटात दिक्षा व्यवहारे, पियुष गायकवाड, आर्या गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.
वन्यजीव आणि मानव संघर्ष हा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता. या उपक्रमास वनपरिमंडळ भोसगांव आणि छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल मालदन यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसादही उल्लेखनीय होता.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत काळे यांनी निसर्ग संवर्धन आणि त्याबाबतची जागर सामाजिक परिवर्तन संस्थेची भूमिका मांडली. पर्यावरणाचा समतोल साधणे आणि जैवविविधतेचे संरक्षण ही काळाची गरज आहे. आपले अस्तित्व आणि आपल्या पुढाच्या पिढयांचे भविष्य यावरच अवलंबून आहे. तसेच ही सामुदायिक जबाबदारी असून सर्वांनी या चांगल्या कामी हातभार लावावा असे आवाहनही याप्रसंगी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देवून सरपंच सौ.गितांजली काळे, उपसरपंच ज्योतिराज काळे, माजी सरपंच भिमराव गायकवाड, माजी सरपंच आबासोा काळे, छ.शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक वाघ सर, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक महाडीक सर या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्व.स्वातंत्र्यसैनिक पांडूरंग साळुंखे यांच्या स्मरणार्थ संस्थेचे मार्गदर्शक सदस्य श्री राजेश साळुंखे यांनी सर्व बक्षीसे दिली. स्पर्धेचे परीक्षण प्रा.रुबिना मुल्ला, प्राध्यापक सागर काळे, स्नेहल मोहिते आणि ग्रेटा डिसोझा यांनी केले.
सुत्रसंचालन संस्थेचे सदस्य अनिरुध्द पन्हाळे यांनी केेले तर आभारप्रदर्शन कृषी उद्योजक विजय काळे यांनी केले. कार्यक्रमास गावातील मान्यवर, ग्रामस्थ शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांकडूनच या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.