ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी या ग्रामपंचायतीस आसाम राज्याच्या 26 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. पंचायत राज व्यवस्थेमध्ये केलेल्या कामाची पाहणी करून त्यांनी मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचे कौतुकही केले. गावाने राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून आसामचे वरिष्ठ अधिकारी भारावून गेले. मान्याचीवाडी आता राज्यासाठीच नव्हे तर परराज्यातीलही वरीष्ठ अधिकाऱ्यांसाठी अभ्यास केंद्र बनले आहे.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी पदाधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर परराज्यातील अधिकाऱ्यांनाही त्यांच्या मागणीनुसार या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते या संस्थेकडे आसाम राज्याच्या उपसचिव सहसचिव अशा 26 अधिकाऱ्यांची टीम प्रशिक्षणासाठी आली होती. या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने काम चालते लोकसहभागातून गावचा विकास, ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, सुशासन, लोकसहभाग, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण, पाण्याची व्यवस्था प्राथमिक शिक्षण, अंगणवाडी (एकात्मिक बाल विकास प्रकल्प) आदींचा अभ्यास करण्यासाठी मान्याचीवाडी ग्रामपंचायतची निवड करण्यात आली होती.
गुरुवारी सकाळी अकरा वाजता 26 वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम मान्याचीवाडी मध्ये दाखल झाली ग्रामस्थांच्यावतीने आसामच्या पाहुण्यांचे स्वागत सजवलेल्या बैलगाडीतून फेटा बांधून आणि ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. यावेळी यशदा चे सत्रसंचालक प्रज्ञा दासरवार, रुपेश पवार, अभिजीत चव्हाण, गटविकास अधिकारी गोरख शेलार, गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर, माजी शिक्षण सभापती यु.टी. माने, सरपंच रवींद्र माने, सदस्य उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, मनीषा माने, सीमा माने, लता आसळकर, निर्मला पाचपुते, बजरंग माने, ग्रामसेवक प्रसाद यादव आदींनी गावात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती संबंधितांना दिली.
- भरलं वांग आणि खराड्यावर मारला पाहुण्यांनी ताव..
येथील बचत गटाने आसामच्या खास पाहुण्यांसाठी महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत केला होता. यामध्ये भरलं वांग खर्डा शेवयाची खीर लोणचं पापड आदींचा समावेश होता मात्र भरलं वांग आणि खरडा हा पाहुण्यांच्या जेवनात वेगळाच आकर्षण ठरला.
- सौर ऊर्जा बायोगॅस आणि स्वच्छतेने लक्ष वेधले
गावात राबवलेला सौर ऊर्जा प्रकल्प बायोगॅस प्रकल्प आणि गावातील स्वच्छता पाहून आसामचे वरिष्ठ अधिकारी भारावून गेले त्यांनी या उपक्रमांसाठी आलेला खर्च त्याचबरोबर गावातील स्वच्छतेसाठी राबवत असलेले उपक्रम याची दखल घेत गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.