उंडाळे : जयसिंगराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करताना इंद्रजीत देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील व इतर मान्यवर.
जयसिंगराव पाटील यांनी आयुष्यभर स्वतःला सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी जोडून घेतलं, त्यांची गोरगरिबांच्या हृदयावर सत्ता आहे, म्हणूनच ते सर्वसामान्य लोकांच्या हृदयातील सम्राट ठरले,असे गौरवोद्गार शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी काढले. उंडाळे ता.कराड येथे ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील,सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मानसिंगराव जगदाळे, सारंग पाटील, माजी सभापती देवराज पाटील, दयानंद पाटील,, यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. देशमुख म्हणाले, बापूं सारख्या पवित्र शुद्ध माणसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा आनंद मोठा आहे. बापूंनी वडिलांच्या विचाराशी प्रामाणिक राहात आयुष्य कृतार्थ केले. या विभागातील जनतेच्या सेवेसाठी निसर्गानेच जणू बापूंची व्यवस्था केली होती. आज मात्र बापूंच्या काळातील ही कसदार पिढी नामशेष होत आहे. आजची पिढी कसदार करायची असेल तर बापूंची तत्त्वे - विचार जपणे, ही आपली जबाबदारी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून अडीच तास जागेवरून न हालता आपण या सद्पुरुषाच्या 91 वर्षाच्या तपचर्येला सलाम केलात हीच आजवरच्या बापूंच्या कामाची पोचपावती आहे.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले,जयसिंगराव पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या घरात जन्म घेतला. वडिलांच्या देशभक्तीच्या समाजसेवेच्या विचारांची बापूंनी मशागत केली त्यामध्ये शिक्षण, सहकार, लोकसेवा ही उंडाळकर घराण्याची जमीन विकसित केली. त्यांच्या बंधूंनीही त्यामध्ये मेहनत घेऊन बीजारोपण केले आणि प्रशासन राजकारणात राज्यात धडक मारली आता याच विचारातून नवीन रोपटे रुजू पाहते, त्यालाही ताकद द्या. डोळ्यात मदत वाचून मदत करणे ही परंपरा बापूंनी बाळगली. त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढील पिढीने चालावे. बापूंच्या सहवासाची अजूनही सावली, सुगंध, फळे मिळावीत हीच प्रार्थना.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले सर्वसामान्यांच्या सोयीसुविधा साठी बापू झटले. समाजकारण करण्याचे व्रत बापूंनी आयुष्यभर जपले. बापूंच्या काळात लोकांच्या गरजा कमी होत्या. अपेक्षा कमी होत्या मात्र सध्या देशातील राजकारणाचे चित्र पूर्ण बदलले आहे. समाजाचा स्वभाव बदलला जनता प्रसारमाध्यमाच्या दबावाखाली आहे. मात्र जनता हळूहळू उठावच करू लागली आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांच्या विचारांची गरज आहे, बापूंच्या माध्यमातून ते विचार लोकांपर्यंत पोहोचावेत.
सत्काराला उत्तर देताना जयसिंगराव पाटील म्हणाले, मी आजवर आई-वडिलांकडून मिळालेली शिकवण जतन करण्याचा प्रयत्न केला. माझं जीवन माझी पायवाट पंढरपूरकडे बघून सुरू आहे. आज पर्यंत कोणत्याही प्रकारच्या शिंतोडा उडवून घेतला नाही. मूल्यांची कधी प्रतारणा केली नाही. तेच संस्कार मुलांमध्ये रुजले कुटुंबाला मान सन्मान मिळाला. पक्षीय बाबतीतून मतभेद निर्माण होतात त्यातूनही मार्ग निघत जातील. सामान्यातील सामान्याची सेवा करण्यात आयुष्य गेले. या विचारसरणीत बदल होऊ नये, हीच परमेश्वराकडे मागणी आहे. जीवनाच्या अखेरपर्यंत जनसेवा करण्याची धडपड सुरू राहील.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांचे भाषण झाले.जेष्ठ नेते जयसिंगराव पाटील सत्कार समितीच्या वतीने जयसिंगराव पाटील यांचा शाल, श्रीफळ, श्रीमहालक्ष्मीची मूर्ती व मानपत्र देऊन इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन कल्याण कुलकर्णी व राजेंद्र पाटील येळगावकर यांनी आभार मानले.