आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची- ह.भ.प. रामदास महाराज


 तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. पूर्वीच्या काळी ‘छडी लागे छम छम, विद्या येई घमघम’ अशी म्हण होती. या उक्तीनुसार शिक्षकांच्या कडक शिस्तीमुळे विद्यार्थी घडत असत असे मत श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार ह.भ.प.रामदास महाराज आरेवाडीकर यांनी व्यक्त केले.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि डाकवे परिवार यांच्या वतीने वै.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या समाजप्रबोधनपर कीर्तन सोहळयात ह.भ.प.रामदास महाराज बोलत होते. यावेळी त्यांना ह.भ.प.मधुकर महाराज, मोहन आण्णा, ह.भ.प.निवृत्ती महाराज, ह.भ.प.दादा महाराज, ह.भ.प.तुषार महाराज, ह.भ.प.शाहिद महाराज, ह.भ.प.सदाशिव आचरे व अन्य सहकारी यांची सुरेल साथ लाभली. रामदास महाराज यांनी अभंगांचे साध्या सोप्या भाषेत विवेचन करुन लोकांना मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’’ अशी मनुष्याच्या संसाराची अवस्था आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माची सांप्रदायाची आवश्यकता आहे. ‘‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’’ अशा उक्तीप्रमाणे आपण का करत राहिले पाहीजे. नेहमी चांगले कर्म केले पाहजे’’ यावेळी त्यांनी पुराणातील अनेक दाखले देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ह.भ.प.रामदास महाराज म्हणाले, ‘‘वै.राजाराम डाकवे उर्फ तात्यांचा स्वभाव सर्वांना हवाहवासा होता. समाजात त्यांनी लोकांना चांगल्या पध्दतीने मार्गदर्शन केले. तात्यांसारख्या व्यकित्मत्त्वाची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे.

या कीर्तन सोहळयाप्रसंगी 30 बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे, भरत डाकवे, प्रकाश चव्हाण, प्रथमेश डाकवे, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, वारकरी मंच महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी, डाकेवाडीतील भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि समस्त डाकवे परिवाराने विशेष परिश्रम घेतले.