कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष व सनबीम शिक्षण समूहाचे अध्यक्ष सारंग श्रीनिवास पाटील यांची निवड झाली आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचे पत्र सारंग पाटील यांना मिळाले आहे. खा.शरद पवार यांनी सारंग पाटील यांचे अभिनंदन केले आहे. खा.शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेचे 'जनरल बॉडी सदस्य' म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल आपले व्यक्तिशः व संस्थेतर्फे अभिनंदन करतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे. आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा फायदा रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल, हा विश्वास आहे.
सारंग पाटील हे सनबीम शिक्षण समूहाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या माध्यमातूनही विविध उपक्रम राबवून त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान असते. संगणक साक्षरतेसाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.