काँग्रेसच्या तिरंगा पदयात्रेच्या समारोपला स्वातंत्र्यदिनी कराडात जोरदार प्रतिसाद.


कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षाकडून देशभर तिरंगा गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात सुद्धा काँग्रेस कडून 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तिरंगा गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कराड शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्या पासून उदघाट्न करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रत्येक पदयात्रेत आ. पृथ्वीराज चव्हाण स्वतः उपस्थित राहिले ज्यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह निर्माण होऊन या रॅली चा मूळ उद्देश जो स्वातंत्र्य संग्राम जागविणे आहे तो जनतेपर्यंत पोहचविता आला. या पदयात्रेचा समारोप कराड शहरात 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्र रथपासून स्वातंत्र्य सैनिकांचे चित्ररथ निर्मित केले होते. कराड शहरातील मुख्य चौकातून हि रॅली जाऊन देश रक्षणासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले अशांचा इतिहास चित्र रथांमधून मांडला होता. या पदयात्रेत कराड शहरवासिय मोठ्या संख्येने व उत्साहाने सामील झाले होते. या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आ. उल्हासदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 या पदयात्रेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचा इतिहास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी पुन्हा एकदा जनमाणसात जागविण्यासाठी काँग्रेस पक्षाने 9 ऑगस्ट या क्रांती दिनी ज्या दिवशी महात्मा गांधींनी मुंबईतील गोवालिया टॅंक येथून ब्रिटिशांना "चले जाव" ची निर्णायक हाक दिली या क्रांती दिनापासून पक्षाने तिरंगा पदयात्रेचे आयोजन देशभर केले होते. सातारा जिल्ह्यात सुद्धा प्रत्येक तालुक्यातील जनतेने या पदयात्रेला चांगला प्रतिसाद दिला. आज त्याचे फलीत कराड शहरातील समारोपाच्या रॅलीने होताना समाधान होत आहे.



परंतु माझे या स्वातंत्र्य दिनी आपणास आवाहन आहे कि, स्वातंत्र्य संग्रामामध्ये शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास आपण फक्त स्वातंत्र्य दिनीच जागवून चालणार नाही तर इथून पुढे दररोज प्रत्येक घरा घरात त्यांचा इतिहास जागविण्याची गरज आहे आणि असे झाले तरच हि खरी श्रद्धांजली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना राहील.