खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्काराचे वितरण


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०१९ व २०२० मधील पुरस्कारांची घोषणा ट्रस्टचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे यांनी केली आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासाहेब निवडुंगे, सचिव सौ. रेश्मा डाकवे व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातून या संदर्भात प्रस्ताव मागवण्यात आले होते. सुमारे ६०० प्रस्तावातून २०१९ मधील ३० व २०२० मधील ४० अशा व्यक्ती व संस्था यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शनिवार, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे गौरविण्यात येणार आहे.

सन २०१९ आणि सन २०२० मधील पुरस्कार सोहळा कोरोना संसर्गामुळे झाला नव्हता. तो यंदा एकत्रित घेण्यात येत आहे. सदरील पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.

खा. श्रीनिवास पाटील, सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा. अरुण घोडके, प्रेरणा संवर्धन तज्ञ, परिवर्तन संस्थेचे किशोर काळोखे, शिवचरित्र आणि संभाजी महाराज चरित्र अभ्यासक ह. भ. प. प्रा. डॉ. प्रदीप पांडुरंग यादव, प्रा. ए. बी. कणसे, महात्मा गांधी विद्यालय, पाचवडचे कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, कलाशिक्षक जयंत कदम व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. अभिनेते रवींद्र साळुखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, राजश्री परुळेकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे..

सदर पुरस्काराचे वितरण व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान शनिवार, दि. २७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता वेणूताई चव्हाण सभागृह, कराड, जि. सातारा येथे होणार आहे.. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे...