शिबे सर, तुम्ही यावेळी ‘‘नाही’’ म्हणायला हवे होते....

 


सहवेदना ....

आपल्या जीवनात घडत असलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात. जीवन हे क्षणभंगुर आहे. अनेकदा याची आपल्याला जाणीव होते. आपल्या सोबत हसत खेळत वावरणारी माणसं ज्यावेळी अचानक आपल्या पासून दूर निघून जातात त्यावेळी मन कासावीस होतं. तसंच काहीसं माझं झालंय.....! प्रा.अशोकराव शिबे सर यांचे आज झालेलं आकस्मिक निधन काळजाला तीव्र वेदना देवून गेलंय....

शिबे सर आणि माझा काही वर्षापूर्वीचा संपर्क असला तरी तो वर्षानुवर्षे असल्यासारखा वाटत होता. सरांच्या डोळयावर नेहमी चष्मा, हसण्याची एक वेगळी लकब, स्वभावात गोडवा, जीभेवर साखर होती. ढेबेवाडी येथील काॅलेजमध्ये ऍडमिशनसाठी कधी फोन केला तर...‘‘संदीप, पाठवून द्या करुन टाकू?,’’ ‘‘नाही होणार’’ हा शब्द त्यांच्याकडे नव्हताच.

तद्नंतर रिटायर्ड झाल्यानंतर संस्थेच्या कामानिमित्त त्यांच्याशी नेहमी बोलणं होत असे, कार्यक्रमात गाठीभेटी होत असत. सध्याच्या सोशल मिडीयामुळे हे बोलणं अधिकच होत असे. मी पाठवलेल्या ‘‘मेसेज’’ ला त्यांचा नेहमी रिप्लाय असे. ‘‘बोला डाॅक्टरसाहेब’’, ‘‘अभिनंदन डाॅक्टरसाहेब’’ असे त्यांचे शब्द नेहमी असत. ते खूप प्रेरणा देत.

आज सकाळी ते गेल्याचा मेसेज वाचला आणि काळजात धस्सं झालं. मनाची घालमेल झाली. त्यांच्या सोबतच्या आठवणी पटकन डोळयासमोरुन तळरुन गेल्या.

मी त्यांना कार्यक्रमाला बोलवण्यानंतर किंवा अन्य कामासाठी फोन केल्यानंतर ते कधीच "नाही" म्हटले नाहीत. त्यामुळेच त्यांनी मृत्यूलादेखील "नाही" म्हटले नसावे.

....पण खरं सांगू सर, तुम्ही यावेळी सपशेल चुकलात... आम्हाला रडवून गेलात.....मृत्यूला तुम्ही ‘‘नाही’’ म्हणायला हवे होते. सरांच्या आकस्मिक जाण्याने शिबे परिवारवर आलेल्या दुःखातून ईश्वराने त्यांना सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना....!

 डॉ. संदीप डाकवे

     स्पंदन परिवार