विधवा भावजयीशी दिराने बांधली लग्नगाठ ! या क्रांतिकारक निर्णयाचे सर्वत्र कौतुक.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

रुढी परंपरेचे बंध तोडून काळगांव ता.पाटण येथील एका विधवेचे तिच्या सख्खा दिराशी लग्नाचे अनोखे बंधन बांधण्याची घटना घडली आहे.

चार वर्षांपूर्वी काळगांव कुमाळ ता. पाटण  येथील तेजस्विनी पाटील हिचे तेथीलच सुरज दिनकर देसाई यांच्याशी विवाह झाला होता. तेजस्विनीचे लग्न होऊन चार वर्षे झाली होती. तिला 3 वर्षाचा मुलगा देखील आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी तिचे पती सुरज चे अपघातात अकाली निधन झाले. 

तेजस्विनीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीमध्ये तेजस्विनीला तिची आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलाच्या पुढील आयुष्याचा प्रश्न पडला होता. आपल्या मुलाच्या भविष्याचे काय होईल? या चिंतेने तेजस्विनीच्या माहेरचे व्यथित होते. परंतु अशा परिस्थितीत पाटील व देसाई कुटूंबानी एकत्र बसत एक धाडसी निर्णय घेण्याचे ठरवले.

त्यांनी तेजस्विनीच्या पतीच्या भावाशी म्हणजेच दिर सुधीर देसाईशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. या वेळी उच्चशिक्षित सुधीर याने या निर्णयाला सहमती दर्शिवली व लग्नाच्या रूढी परंपरा मोडीत काढल्या व समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

नुकतेच तेजस्विनी आणि सुधीर यांचा विवाह पार पडला आहे. या वेळी काळगांव येथील देसाई व पाटील कुटूंबातील सर्व नातेवाईक व ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थीत होते.