श्रीनिवास पाटील फाउंडेशन आयोजित ‘ती’ चा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
सातारा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घ्यावी. तिने उज्ज्वल यश संपादन करावे. यासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठबळ देणे गरजेचे आहे. महिलांचा आदर करणे, त्यांना सन्मान देणे हा खरा स्त्री शक्तीचा जागर आहे, असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.
सनबीम आयटी पार्क, सातारा येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला ‘ती’ चा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात सपन्न झाला. यामध्ये कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, उद्योग, कृषी, पर्यावरण अशा विवध क्षेत्रात योगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महिलांचा ‘आदिशक्ती पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. तसेच देश सेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी यांचा विशेष सन्मान श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील लुप्त होत चाललेल्या पाककृती व पारंपारिक खाद्यपदार्थ यांच्या संवर्धनासाठी 'सुगरण साताऱ्याची' ह्या पाककला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना खा.श्रीनिवास पाटील यांनी महिलांचे कौटुंबिक व सामाजिक योगदान व त्यांचे महत्व अधोरेखित केले.
खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, समाजाला परिपूर्ण करण्यासाठी नारीशक्ती महत्वाची भूमिका बजावते. पुरस्कार एक मोठी जबाबदारी देऊन जातो. महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी हुरूप यावा, तसेच समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची जाणीव होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुरस्कार देण्यात येतो. आजच्या काळात महिला केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तिने रोजच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. एकांगी भूमिकेतील महिला आता बहुअंगी भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. कुटुंबातील व समाजातील त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. तर त्यांचा विकास हा ध्यास घेऊन कार्य करणे महत्वाचे असून तशी सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे. त्यानुसार श्रीनिवास पाटील फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे.
शूरवीरांची भूमी म्हणून ओळख असलेल्या आपल्या सातारा जिल्ह्याला सैनिकांचीही मोठी परंपरा आहे. देश सेवेसाठी कर्तव्य बजावताना अनेक सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करण्याबरोबरच आपण कायम त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे. श्रीनिवास पाटील फाउंडेशन या वीरमाता व वीरपत्नींच्या पाठीशी खंबीरपणे कायम उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
सारंग पाटील म्हणाले, स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. वेळोवेळी तिने तिचे वर्चस्व आणि क्षमता आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांचे योगदान व समर्पित वृत्तीमुळे महिला भगिनी कौतुकास पात्र आहेत. त्यांना अशीच प्रेरणा मिळत राहण्यासाठी यापुढे देखील त्यांच्यासाठी श्रीनिवास फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यातून आदर्श महिलांची एक मोठी फळी यानिमित्ताने तयार होऊन ती समाजासाठी दिशादर्शक ठरेल.
पारंपरिक खाद्यसंस्कृती जतनासाठी फाउंडेशनचा पुढाकार
सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यात पारंपरिक पाक कला व खाद्यसंस्कृती लुप्त होत चालली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत असताना आपल्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणा-या पारंपारिक पाककलेकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. सण-उत्सवात बनवण्यात येणारे विविध पारंपरिक खाद्यपदार्थ टिकून रहावेत, तसेच आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्व ओळखून या खाद्यपदार्थांना दैनंदिन आहारात प्राधान्य द्यावे. याच्या जनजागृतीसाठी श्रीनिवास पाटील फाउंडेशन पुढे आले आहे. याकरिता या सन्मान सोहळ्यात ‘सुगरण साता-याची’ ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पारंपारीक खाद्यपदार्थ सादर केले. यावेळी सहभागी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेच्या परिक्षणासाठी महाराष्ट्रातील नामांकित शेफ उपस्थित होते. दरम्यान महिला सबलीकरणासाठी महत्वपूर्ण असलेल्या सातारा महिला ॲग्रो प्रकल्पाचा शुभारंभही खा.पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी सौ.रजनीदेवी पाटील, श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.रचना पाटील, कराडच्या माजी नागराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, सोल डिटोक्स टीमच्या ज्योती काटकर, सर्वेश जाधव, कुणाल घोडके, यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.