महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या.
खा.श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत जोरदार मागणी
कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यटकांचे आकर्षण वाढावे, पर्यटनातून त्या भागाचा विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे यासाठी महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्यावी अशी जोरदार मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.
संसदेत लोकहिताचे तातडीच्या मुद्दावर चर्चेवेळी बोलताना खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, माझ्या लोकसभा मतदारसंघात, सातारा जिल्ह्यात पाचगणी आणि महाबळेश्वर ही जागतिक दर्जाची थंड हवेची ठिकाणे आहेत. ही ठिकाणे ब्रिटिश काळापासून गाजलेली आहेत. ही ठिकाणे मनमोहक, नैसर्गिकदृष्टया समृद्ध व आरोग्यदायी अशी आहेत. पूर्वीच्या काळी येथील लोकवस्ती अतिशय थोडी होती. आता लोकसंख्या वाढून ती तिप्पट झाली आहे. पाचगणी येथे शाळा, इंग्लिश मेडियम स्कूल आहेत. त्या शाळेत भारताच्या सगळ्या क्षेत्रातून विद्यार्थी येत असतात. मात्र गेली कित्येक वर्ष या भागाचा विकास करण्याकरता पाचगणी आणि महाबळेश्वर नगरपालिकेने जो मास्टर ट्यूरिझम प्लॅन भारत सरकारकडे पाठवला आहे त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आहे त्या भागात, परिस्थितीत सर्व योजना राबवाव्या लागतात. परिणामी येणाऱ्या पर्यटकांना, प्रवाशांना अपेक्षित अशी सोयीसुविधा मिळत नाही. त्यांची राहण्याची सोय होत नाही. खेळणी, घोडे आदी करमणूकीचे प्रकार होत नाहीत. ब्रिटिश काळामध्ये घोड्याच्या पाठीवरून वेगवेगळे पॉंईट बघण्याकरता राईडस् होत असतात. ते पॉंईट ढासळले आहेत, पाय-या निखळल्या आहेत. त्यामुळे घोड्यावरून पडण्याची संख्या वाढून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याठिकाणच्या संवर्धनासाठी, पर्यटन विकासासाठी तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे पर्यटन स्थळ निर्माण व्हावे म्हणून जो मास्टर प्लॅन दिलेला आहे तो लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा. त्यातून त्या भागातील स्थानिक सर्वसामान्य माणसांना रोजगार मिळावा, फळे-फुले विक्री करता यावीत. प्रसिध्द अशी घोड्यांची सवारी करता यावी. हा मास्टर प्लॅन मंजूर करण्याकरिता जास्तीजास्त प्रयत्न व्हावेत. त्यास वन व पर्यावरण मंत्र्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली.
खा.श्रीनिवास पाटलांचा मराठीबाणा -
खा.श्रीनिवास पाटील यांचे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. तर ग्रामीण मराठी भाषा बोलतानाची त्यांची वेगळी अशी शैली आहे. लोकसभेत ते सातारा मतदारसंघातील प्रश्न विविध भाषातून मांडताना दिसून येतात. महाबळेश्वर व पाचगणीच्या विकासासाठी बोलताना त्यांनी मराठी भाषेची आवर्जुन निवड केली. संसदेत त्यांनी मराठीतून केलेल्या भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधले.