कराड दक्षिणचे नेते अशोकराव भावके यांना धडक देणाऱ्या कारचालकाला अटक.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड दक्षिणचे नेते व श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव जगन्नाथ भावके यांना धडक देणाऱ्या कारचालकाला पुण्यातून अटक करण्यात यश आले आहे. काल रात्री उशिरा किरण महेंद्र महादे (वय 28 वर्ष रा, शांतीनगर, येरवडा पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तसेच धडक दिलेली कारही ताब्यात घेण्यात आली आहे.

कराड तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड ते चांदोली रस्त्यावर घोगाव (ता. कराड) येथे श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव भावके यांना अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिलेली होती. या धडकेत त्यांचे निधन झाले. अपघातातील धडक देणारा कार चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी सखोल तपासाचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरिक्षक सखाराम बिराजदार, फौजदार भरत पाटील, हवालदार संदिप कांबळे, गुन्हे प्रकटीकरणचे सज्जन जगताप यांनी गुन्ह्याचा तपास केला.

पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यावरून होंडा सिटी कार (एमएच- 02 - बीपी- 6657) जप्त केली आहे. तसेच कार चालकालाही ताब्यात घेतले आहे. सहायक पोलि निरिक्षक बिराजदार, हवालदार कांबळे व जगताप यांनी पुणेतील विश्रांतवाडी पोलीसांशी संपर्क साधून पळून गेलेला कारचालक किरण महादे यास ताब्यात घेतले. त्याची शांतीनगर पुणे येथे गॅरेजवर दुरुस्तीला लावलेली होंडा सिटी कारही जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक खोबरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षक बिराजदार, फौजदार पाटील, हवालदार कांबळे, जगताप यांनी तपासात सहभाग घेतला.