मर्चंट सिंडिकेटचे संस्थापक अनिल शिंदे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
अल्पावधीतच नावारूपास आलेल्या तळमावले (ता. पाटण) येथील शेतकरी वर्गाची नावाजलेली मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मा. चेअरमन अनिल शिंदे यांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशन यांच्या मार्फत यंदाचा यशवंतराव चव्हाण हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साप्ताहिक यशवंत नीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारे सन २०२१ चे यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाले असून रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता तळमावले ता. पाटण येथील वांगव्हॅली भवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवर व्यक्तीना यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात येते. मर्चंट सिंडिकेटचे संस्थापक अनिल शिंदे यांच्या माध्यमातून तळमावले तसेच कुंभारगाव व काळगाव भागात सहकार क्षेत्रातुन किंवा सामाजिक माध्यमातून समाजाच्या हितासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.  तसेच भागातील प्राथमिक शाळांना वेळोवेळी मदत केली आहे. अनेक रक्तदान शिबिरे आयोजित करून मर्चंट सिंडिकेट संस्थेच्या वतीने समाजाचे दायित्व सांभाळले आहे.  यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याने मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.